विमाने घ्याल, तरच कारखाना भारतामध्ये!
By admin | Published: August 7, 2016 01:47 AM2016-08-07T01:47:14+5:302016-08-07T01:47:14+5:30
जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आमच्या एफ-१६ ब्लॉक ७० या विमानांचीच भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्याची हमी भारताने दिली तरच, कारखाना इथे हलविण्याची
नवी दिल्ली : जगात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या आमच्या एफ-१६ ब्लॉक ७० या विमानांचीच भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्याची हमी भारताने दिली तरच, कारखाना इथे हलविण्याची आमची तयारी आहे, असा प्रस्ताव लॉकहीड मार्टिन या संरक्षणसामुग्रीचे उत्पादन करणाऱ्या बलाढ्य अमेरिकी कंपनीने दिला
आहे.
‘मेक इन इंडिया’चा फायदा घेऊन जगातील कंपन्यांनी भारतात यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यास अनुसरून लॉकहीड मार्टिन कंपनीने हा प्रस्ताव दिला आहे. कंपनीच्या एफ-१६ व्यवसाय विभागाचे प्रमुख रॅण्डल एल. हॉवर्ड म्हणाले की, एफ-१६ ब्लॉक ७० लढाऊ विमाने भारतासाठी, तिथेच तयार करून त्यांची तेथूनच जगभरात निर्यात करण्याची कंपनीची तयारी आहे. ती भारतने घेण्याच्या अटीवरच कंपनी अमेरिकेतील कारखाना इथे हलविणार का, असे विचारता कंपनीचे भारतातील प्रभारी अभय परांजपे यांनी ‘हो’ असे उत्तर दिले.
भारताने विमाने खरेदी करायलाच हवीत, अशी अट घालताना तुम्ही एफ-१६ विमाने पाकिस्तानला न देण्याची हमी द्यायला तयार आहे का, या प्रश्नाला सरळ उत्तर देण्याचे टाळत ते म्हणाले, आमची विमाने भारतीय हवाई दलासाठी सर्वोत्तम आहेत. त्यामुळे दिलेला शब्द पाळेल, असा भागीदार भारताने निवडणे महत्त्वाचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
लॉकहीड मार्टिनचा प्रस्ताव
लॉकहीड मार्टिन कंपनीने आत्तापर्यंत एफ-१६ जातीची ४,५८८ विमाने जगभर विकली आहेत. कंपनीकडे सध्या असलेल्या आॅर्डर पूर्ण करण्यासाठी त्यांचा अमेरिकेतील कारखाना आणखी वर्षभर सुरु राहू शकेल. इतर देशांकडून मागणी आली तर कारखाना त्यापुढे पाच वर्षे सुरु राहू शकेल.
भारतात कारखाना सुरु केल्यास भारताची गरज भागविण्याखेरीज इतरांसाठी आणखी १०० विमाने येथे उत्पादित करण्याची कंपनीची योजना आहे. -अमेरिकेच्या हवाई दलात एफ-१६ विमाने पुढील किमान एक दशक तरी वापरात राहणार आहेत.