दगडफेक करणा-यांवर जवान चालवणार "प्लास्टिक बुलेट्स"
By admin | Published: April 18, 2017 12:00 PM2017-04-18T12:00:14+5:302017-04-18T12:00:14+5:30
काश्मीरमध्ये दगडफेक करणा-यांशी दोन हात करण्यासाठी आता प्लास्टिक बुलेट्सचा वापर करण्यात येणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - काश्मीरमध्ये दगडफेक करणा-यांशी दोन हात करण्यासाठी आता प्लास्टिक बुलेट्सचा वापर करण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दगडफेक करणा-यांना नियंत्रणात आणण्यासाठी प्लास्टिक बुलेट्सचा वापर करावा असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. लाखो प्लास्टिक बुलेट्स काश्मीरला पाठण्यात आल्या आहेत. एखाद्या परिस्थितीत शेवटचा पर्याय म्हणून पेलेट गन वापरावी असंही गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. पेलेट गन्समुळे काश्मीरमधील अनेकांना अंधत्व आलं आहे. सर्वोच्च न्यायालयानेही पेलेट गनसाठी पर्याय निवडण्यास सांगितलं आहे.
प्लास्टिकच्या या बुलेट्स शरिरात घुसत नाही. यांना इन्सास (INSAS) रायफल्सने फायर केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून जवानांना काश्मीरमध्ये अनेकदा हिंसक निदर्शन आणि दगडफेकीचा सामना करावा लागत आहे. पुष्कळ वेळा दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु असताना स्थानिक लोक दगडफेक करत जवानांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी दगडफेक करणा-यांचा सामना करण्यासाठी जवानांकडून पावा शेल्स आणि पेलेट गनचा वापर केला जातो.
सोमवारी पुलवामा जिल्ह्यात शालेय विद्यार्थी आणि जवान भिडले होते. शनिवारी एका डिग्री कॉलेजमध्ये सुरक्षा जवान दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर केलेली दगडफेक आणि त्यानंतर जवानांनी केलेल्या कारवाईत 50 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी संपुर्ण खो-यात निदर्शन करण्यात आलं. काश्मीर खो-यात इंटरनेट सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.