हिंदू असाल तरच गरबा खेळा
By admin | Published: October 15, 2015 02:23 AM2015-10-15T02:23:37+5:302015-10-15T02:23:37+5:30
गरबा केवळ हिंदूंसाठी असल्यामुळे बिगर हिंदूनी गरबा नृत्यात सहभागी होऊ नये,एवढेच नव्हे त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणार नाही
अहमदाबाद : गरबा केवळ हिंदूंसाठी असल्यामुळे बिगर हिंदूनी गरबा नृत्यात सहभागी होऊ नये,एवढेच नव्हे त्यांना कार्यक्रमस्थळी प्रवेश मिळणार नाही, असे बॅनर गुजरातमधील काही निवडक गरबा स्थळांवर लावत विहिंपने खळबळ उडवून दिली आहे. नवरात्रोत्सवात गरबाची धूम सुरू असताना विहिंपने राज्यव्यापी मोहीम छेडल्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
गुजरातमध्ये व्यावसायिक स्वरूपात गरबा आयोजित होणाऱ्या किमान शंभर स्थळांवर असे बॅनर लावण्यात येत असल्याचे विहिंप नेत्यांनी सांगितले. अहमदाबादमधील एसजी हायवेवरील राजपथ क्लब या गरब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या स्थळाच्या प्रवेशद्वारावर असे पहिले बॅनर लागल्यानंतर हळहळू संपूर्ण शहरात असे बॅनर लागू लागले आहेत. सुमारे शंभर ठिकाणी बॅनर लावून लक्ष वेधले जाणार असल्याचे विहिंपचे प्रसिद्धी समन्वयक जय शाह यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)
गेल्याच आठवड्यात गुजरात विहिंपचे सरचिटणीस रणछोडदास भारवाड यांनी निवास सोसायटींसह गरबास्थळी बिगरहिंदूंना प्रवेश नाकारण्याची खबरदारी घेणार असल्याची घोषणा केली होती.
मुस्लीम मुले हिंदू मुलींना जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’ छेडत असल्याच्या घटना रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचा दावा या संघटनेने केला होता. निवासी सोसायटींमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या गरब्याचा कालावधी वाढविण्यासाठीही विहिंपने पुढाकार घेतला आहे.