रिओमधून परतलेल्या खेळाडूंना झिका व्हायरसची लागण ?
By admin | Published: August 23, 2016 08:11 AM2016-08-23T08:11:11+5:302016-08-23T08:11:11+5:30
ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या स्टीपलचेस अॅथलीट सुधासिंगला झिका व्हायरसची लागण झाली असल्याचा संशय आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या स्टीपलचेस अॅथलीट सुधासिंगला झिका व्हायरसची लागण झाली असल्याचा संशय आहे. सुधासिंगला बंगळुरुमधील फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिला सतत देखेरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. सुधासिंगने रिओ ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये भाग घेतला होता.
शनिवारी 20 ऑगस्टला ब्राजीलमधून भारतात परतल्यानंतर सुधासिंगला ताप आणि अंगदुखीचा त्रास होत होता. ही लक्षणं झिकाची असल्याची भीती असून, सुधाला झिकावरच्या उपचारांसाठी औषधं सुरू करण्यात आली आहेत.
'डेंग्यू आणि चिकनगुनिया टेस्ट निगेटिव्ह आले असून झिका व्हायरस टेस्टचा रिपोर्ट 48 तासात उपलब्ध होईल. हॉस्पिटलमध्ये सुधाला वेगळं ठेवण्यात आलं आहे. तसंच विशेष काळजी घेतली जात आहे', अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याचे अतिरिक्त सचिव सी. के. मिश्रा यांनी दिली आहे.
कविता राऊतचीदेखील तपासणी
ब्राझिलच्या उच्च आयुक्तांकडून देण्यात आलेल्या आदेशांनुसार धावपटू कविता राऊतची रुग्णालयात तपासणी करण्यात आली. नाशिक जिल्हा कविता राऊतची तपासणी करण्यात आली त्यानंतर रक्ताचेही नमुने घेण्यात आले. कविताने जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिल्याने तिचे रक्ताचे नमुने आता पुण्याला पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आली.