अरविंद केजरीवाल यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
By admin | Published: October 19, 2016 06:55 PM2016-10-19T18:55:49+5:302016-10-19T19:08:23+5:30
मानहानीचा दिवाणी खटला सुरू असताना ट्रायल कोर्टात त्याच प्रकरणात सुरू असलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीस स्थगिती द्यावी, यासाठी केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - अरुण जेटलींच्या मानहानी प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी धक्का दिला. मानहानीचा दिवाणी खटला सुरू असताना ट्रायल कोर्टात त्याच प्रकरणात सुरू असलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीस स्थगिती द्यावी, यासाठी केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये जेटली यांनी अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या इतर पाच नेत्यांविरोधात मानहानीचा खटला दावा आणि फौजदारी खटला दाखल केला होता.
फौजदारी आणि दिवाणी खटल्याची सुनावणी एकत्र सुरू असल्याने आरोपींवर कोणताही अन्याय होत नाही, असे सांगत उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच यापुढेही दोन्ही खटल्यांची सुनावणी एकत्र होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर केजरीवाल यांनी मानहानी प्रकरणात दोन खटले सुरू असल्याने फौजदारी खटल्याच्या सुनावणीस स्थगिती देण्याची मागणी केली होती.
डीडीसीएचे माजी अध्यक्ष असलेल्या जेटली यांनी यांनी फिरोझशाह मेहता स्टेडियमचे बांधकाम सुरू असताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केजरीवाल आणि आपच्या इतर नेत्यांनी केला होता. मात्र जेटली यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच केजरीवाल आणि आपच्या इतर नेत्यांनी बेताल वक्तव्ये करून आपली आणि आपल्या परिवाराची मानहानी केल्याचा दावा करत भाजपा नेते अरुण जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. तसेच जेटली यांनी केजरीवालांवर 10 कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा ठोकला होता.