Maharashtra Political Crisis: “आमच्या याचिकेवर तातडीने निर्णय घ्या”; उद्धव ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मागणी, CJI म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:58 PM2022-08-16T13:58:23+5:302022-08-16T13:58:39+5:30
Maharashtra Political Crisis: काही दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली:एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का दिला. या बंडखोरीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय सत्तासंघर्ष शिगेला गेला अन् महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) कोसळले. शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार आले. यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायलायातील सुनावणी २२ ऑगस्टपर्यंत पुढे गेली आहे. यातच आमच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दाव्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह राहणार की नाही हेही संकट निर्माण झाले. त्यामुळे ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता याबाबत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा महत्त्वाचा निर्णय सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ही याचिका सरन्यायाधीश रमणा यांच्या खंडपीठासमोर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरन्यायाधीश म्हणतात, निकाल देणे आवश्यक आहे
शिवसेना विरुद्ध शिंदेसेना यासंदर्भातील विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच शिवसेना कुणाची या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरील सुनावणी आधी घेण्यात यावी, अशी याचिका उद्धव ठाकरे गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात मेंशन करण्यात आली. मात्र हा खटला घटनापीठासमोर चालवायचा की नाही, यासंदर्भातीलच निकाल होणे बाकी आहे. तसेच याबाबत आम्हाला निकाल देणे आवश्यक असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. उद्धव ठाकरे तसेच शिंदेसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीचे पुरावेही दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर कुणाचा हक्क आहे, यासंदर्भातील निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत येत्या १९ ऑगस्ट रोजी घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या नेतृत्वाला झुगारुन बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटासंबंधीच्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाल्याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.