ददलानी यांना क्षमा करावी, विजय दर्डा यांचे जैन समाजाला आवाहन
By admin | Published: August 30, 2016 04:35 AM2016-08-30T04:35:39+5:302016-08-30T04:35:39+5:30
जैन धर्माच्या मूळ तत्त्वातच क्षमा आणि दया हा मूळ मंत्र समाविष्ट असल्याने जैन समाजाने विशाल ददलानी यांना क्षमा करावी, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे
नवी दिल्ली : जैन धर्माच्या मूळ तत्त्वातच क्षमा आणि दया हा मूळ मंत्र समाविष्ट असल्याने जैन समाजाने विशाल ददलानी यांना क्षमा करावी, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी केले आहे.
जैन संत आचार्य पूज्य तरुणसागर यांच्याबद्दल विशाल ददलानी यांनी केलेल्या टिपणीवरून उद्भवलेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विजय दर्डा म्हणाले की, क्षमापना महापर्व पर्युषण पर्व आराधनेच्या आधी आपण सर्वजण अंत:करणापासून कोणाला दुखावले असल्यास क्षमा मागतो. हा मूळ मंत्र जैन धर्माच्या शिकवणीचाच एक भाग आहे.
परमपूज्य तरुणसागरजी यांच्याबद्दल विशाल ददलानी यांनी केलेल्या टिपणीने समस्त जैन धर्मीयांच्या भावना दुखावल्या आहेत, हे खरे आहे. तरीही आपण आपल्या धर्माचा मूळ मंत्र विसरता कामा नये. मन मोठे करून ददलानी यांना क्षमा करावी, तसेच ददलानी यांच्याबद्दल अपशब्दाचा वापरही करू नये, असेही आवाहन सकल जैन समाजाचे
राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा यांनी केले आहे.