दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफ करा - चव्हाण
By admin | Published: May 6, 2016 02:21 AM2016-05-06T02:21:04+5:302016-05-06T02:21:04+5:30
दुष्काळाच्या वणव्याने होरपळत असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी
नवी दिल्ली : दुष्काळाच्या वणव्याने होरपळत असलेल्या महाराष्ट्रासह दहा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांना मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी करीत विरोधकांनी लोकसभेत दुष्काळग्रस्तांच्या व्यथेला वाचा फोडली.
दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे उद्भवलेली गंभीर स्थिती, या ज्वलंत मुद्यांवरील लोकसभेतील चर्चेत सहभागी होत खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्र सरकारने वेळीच पावले उचलली असती तर, आज ही स्थिती उद्भवली नसती.
नजीकच्या दिवसांत आणि महिन्यात पावसाने मेहरबानी केली नाही तर, १९७२ सारखी भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. या संकटातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी कर्जाची फेररचना करुन काहीही साध्य होणार नाही. सलग तीन वर्षापासून दुष्काळाच्या झळा शेतकरी सोसत आहे. तेव्हा केंद्राने तात्काळ शेतकऱ्यांचे कर्ज माफी करण्याची गरज आहे. त्यासोबतच मोफत बियाणे आणि खतांचा पुरवठा करावा किंवा कमी दरात बियाणे आणि खते पुरवावीत.
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे २० हजार कोटींचे नुकसान झाले. त्याची पुरेशी भरपाई केली पाहिजे. दुष्काळावर केंद्राने श्वेतपत्रिका आणि सर्वंकष निवेदन जारी करावे, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रात ३ हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, याकडेही अशोक चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या चर्चेप्रसंगी गृह आणि वित्त मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहणे जरुरी होते. केंद्र सरकारने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते. ही रक्कम पाच लाख करण्यात यावी. तसेच त्यांना पेन्शनही दिले पाहिजे अशी मागणी करत उसामुळे महाराष्ट्रात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा दावाही चव्हाण यांनी फेटाळून लावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दुष्काळ व पाणी टंचाईमुळे निर्माण झालेल्या स्थितीवरील चर्चेसाठी निमंत्रित केले. मुख्यमंत्री फडणवीस, अखिलेश यादव व सिद्धरामैय्या यांना पंतप्रधानांनी स्वतंत्रपणे चर्चेसाठी बोलावल्याचे सूत्रांनी सांगितले.