'साहेब, होळीला सुट्टी द्या नाहीतर बायको दुसऱ्यासोबत पळून जाईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:31 PM2020-03-09T15:31:02+5:302020-03-09T15:31:36+5:30
या अर्जद्वारे या पोलिसाने आपली वेगळीच कहानी वरिष्ठांकडे मांडली, सध्या या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भागलपूर - पोलीस विभागात काम करताना किंवा सैन्य दलात काम करत असलेल्या जवानांचा सुट्टीसाठी नेहमीच हिरमोड होतो. इतरांच्या सुट्टीदिवशी त्यांची ऑन ड्युटी असते, हेच आता सर्वांनी मान्यच केलं आहे. मात्र, कुठल्याच सणाला सुट्टी मिळत नसल्याने, एका पोलिसाने पत्र लिहून आपली व्यथा वरिष्ठांकडे मांडली आहे. होळीमुळे पोलीस विभागाकडून सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द केल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील सीटीएस नाथनगर येथील एका प्रशिक्षक पोलीस शिपायाने सीटीएस प्रमुखांकडे अर्ज केला आहे. या अर्जद्वारे या पोलिसाने आपली वेगळीच कहानी वरिष्ठांकडे मांडली, सध्या या अर्जाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या निवेदन अर्जात लिहिले आहे की, 5 मार्च रोजी त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या पत्नीचा फोन आला होता. ''यावेळी होळीच्या सणाला तुम्ही घरी यायचंय, नाही आलात तर मी दुसऱ्यासोबत पळून जाईल,'' पत्नीचे हे वाक्य ऐकून मी खूप तणावात आलो आहे, असे संबंधित पोलिस शिपायाने आपल्या अर्जात म्हटल्याचे वृत्त ईटीव्ही भारतच्या हिंदी वेबसाईटने प्रकाशित केले आहे.
विशेष म्हणजे पुढे विनंतीही केली आहे. मला होळीसाठी 5 दिवसांची सुट्टी द्यावी, अन्यथा तुम्ही माझ्या बायकोला समाजावून सांगावे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पोलीस शिपायाने म्हटले आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा निवेदन अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.