"मला वाचवा, मला जगायचंय, शिकून मोठे बनायचंय"; विवाहितेचा सोनू सूदला मेसेज, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 05:25 PM2023-06-12T17:25:06+5:302023-06-12T17:27:00+5:30
जबरदस्तीने केलेल्या विवाहानंतर आता सासरच्यांकडून तरूणाचा छळ सुरू झाला आहे असं युवतीने म्हटलं.
जोधपूर - सर, मी तरूणा शर्मा, मला वाचवा, मला पुढे शिकायचे आहे परंतु माझ्या घरच्यांनी जबरदस्तीने एका ४० वर्षीय वेड्या मुलाशी लग्न लावले आहे. जो मला शारिरीक, मानसिक आणि लैंगिक टॉर्चर करतो. मला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. सर, मला जगायचंय अशी विनवणी एका तरुणीने अभिनेता सोनू सूद आणि राष्ट्रपती, पंतप्रधानांना ट्विट करून केली.
हे प्रकरण छत्तीसगडच्या कांकेर आणि राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्याशी संबंधित आहे. याठिकाणी एका विवाहितेने जी मूळची जोधपूरच्या बालेसर येथे राहणारी होती. तिचे कांकेरच्या अंतागड येथील मुलाशी लग्न झाले. राजस्थानच्या तरुणा शर्माने तिचा लहानपणीचा मित्र सुरेंद्र सांखलासोबत १३ जानेवारी २०२३ रोजी कोर्ट मॅरेज केले. घरच्यांना न विचारता तरुणाने हे पाऊल उचलल्याने कुटुंब नाराज झाले. त्यांनी मुलीवर मानसिक दबाव टाकून तिला कसंतरी घरी बोलावले. त्यानंतर तिचे लग्न छत्तीसगडच्या अंतागड येथील मुलाशी केले. मुलीच्या कुटुंबाने १ एप्रिल २०२३ रोजी बळजबरीने मुलीचा विवाह जितेंद्र नावाच्या मुलाशी केला.
या मुलीचा आरोप आहे की, जबरदस्तीने केलेल्या विवाहानंतर आता सासरच्यांकडून तरूणाचा छळ सुरू झाला आहे. पीडितेने आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर तिचा जीव बचावला. हॉस्पिटलमध्ये दाखल असतानाच तरूणा शर्माने राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अभिनेता सोनू सूद यांना मेसेज करून मदतीची याचना केली आहे.
या तरूणीने मेसेजमध्ये काय लिहिलंय?
हॅलो, सर नमस्ते, माझे नाव तरूणा शर्मा आहे. मला वाचवा, मला जगायचंय, शिकून मोठे बनायचंय, परंतु माझे लग्न ४० वर्षीय वेडसर मुलाशी केले. तो जबरदस्तीने मला मारहाण करतो. मला टॉर्चर करतो, जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केला. प्लीज सर, मला इथून बाहेर काढा, मागील ६ महिन्यांपासून काय काय झाले हे सांगू शकत नाही. हा माझा शेवटचा प्रयत्न आहे. माझा मेसेज तुम्हाला मिळेपर्यंत मी आयुष्याशी लढाई हरलेली असेल. मला वाचवा असं तिने विनंती केली आहे. या मेसेजची तात्काळ दखल घेत महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत महिला बाल विकास विभागाकडे पाठवले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.