सांगा राया.. सांगा ‘चिन्ह’ कोणते?

By admin | Published: September 29, 2014 10:25 AM2014-09-29T10:25:19+5:302014-09-29T10:26:26+5:30

स्थळ : स्मरणशक्ती संतुलन केंद्र. अनेक नेत्यांच्या सौभाग्यवती (कृपया नीट वाचावे. ‘नेत्यांच्या अनेक सौभाग्यवती’ असे वाचाल तर आम्ही पामर त्याला जबाबदार नाही!

Please tell .. What is the 'sign'? | सांगा राया.. सांगा ‘चिन्ह’ कोणते?

सांगा राया.. सांगा ‘चिन्ह’ कोणते?

Next

 

(स्थळ : स्मरणशक्ती संतुलन केंद्र. अनेक नेत्यांच्या सौभाग्यवती (कृपया नीट वाचावे. ‘नेत्यांच्या अनेक सौभाग्यवती’ असे वाचाल तर आम्ही पामर त्याला जबाबदार नाही!) औषध घेण्यासाठी आलेल्या. बाहेर रांगेत उभे राहून या महिलांची चर्चा सुरू  झालेली.)
पहिली : (इतरांचं लक्ष जावं म्हणून हातातल्या बांगड्या वाजवत) काय गंऽऽ तू इकडं कशी काय?
दुसरी : (चेहरा बारीक करून) दोन दिवसांपासून माझ्या ह्यांना खूप गोंधळल्यागत होऊ लागलंय. काल रात्री मला ‘मॅडमऽऽ मॅडम’ म्हणाले अन् आज सकाळपासून अचानकपणे ‘ताईऽऽ ताई’ म्हणून हाक मारू लागले. ‘पक्ष बदलला की भाषाही बदलते,’ असंच काहीबाही सांगू लागले.
तिसरी : (आश्‍चर्यानं) अग्गोऽऽ बया.. आमच्या साहेबांचं पण अगऽऽदी तस्संच झालंय बघ. फक्त थोडासाच फरक.
चौथी : (तोंडाला पदर लावून खुसूखुसू हसत) म्हणजे रात्रीही तुला ‘ताईऽऽ ताई’ म्हणत होते की काय?
पाचवी : मला तर वाटतंय.. ताप अन् सर्दीची साथ येते तसं, विसराळूपणाची लागण झालीय बहुधा सगळ्याजणींच्या नवर्‍यांना. 
पहिली : होय गं, होय. गेल्या आठवड्यापर्यंत आमचे हे ‘आघाडी झिंदाबाद’ म्हणत होते. त्यानंतर चक्क ‘महायुतीची विजय असो’ असला बोर्ड घेऊन घरी आले.
दुसरी : (कौतुकानं) म्हणूनच तुझे साहेब ‘गुजराती भाषा शिकवणी’ वर्गात जाऊ लागले होते की काय?
पहिली : (हिरमसून) होय; पण काय सांगू? परवा त्यांनी ‘महायुती’चा बोर्ड दिला फेकून कोनाड्यात.. अन् कालपासून गाऊ लागलेत ‘मराठी भाषा छान-छान’ गीत.  
तिसरी : (डोळे फडफडत) आमच्या ह्यांऽऽची पण डिऽऽट्टो तश्शीच परिस्थिती. फक्त त्यांनी ‘सायकल’वर बसून ‘शिट्टी’ वाजविण्याची प्रॅक्टीस सुरू केलीय. 
चौथी : (आपलाही नवरा कमी नाही, हे दाखविण्याच्या अविर्भावात) माझेपण ‘हे’ आजकाल जेवल्यानंतर ‘कपबशी’तूनच पाणी पिताहेत. पहाटे-पहाटे अलार्म वाजणार्‍या ‘घड्याळाला हात’ पण लावत नाहीत. 
दुसरी : (बुचकाळ्यानं) परवा मुंबईला जाताना साहेब मला सांगून गेले होते की ‘हातातला एबी फॉर्म’ घेऊन येतो. पण येताना चक्क ‘कमळ’ हुंगत आले. ते बोलतात काय अन् करतात काय, हेच समजेनासं झालंय गं बाऽऽई. 
सहावी : (पुढं येऊन घाम पुसत) पण माझा नवरा तर मलाच सकाळपासून विचारतोय की ‘मी कुठल्या पक्षाकडनं उभा राहिलोय?’  
सार्‍याजणी: (चिरकून) म्हणजे? काय म्हणतेस काय?
सहावी : होय. त्यांनी तिकीट एका पक्षाचं आणलंय. अर्ज दुसर्‍याचा भरलाय. ‘एबी फॉर्म’ तिसर्‍याचाच दिलाय.. अन् आज सकाळपासून ‘चिन्ह’ चौथ्याच पक्षाचं घेऊन फिरताहेत. चला गं बायांनोऽऽ पटापटा पुढं. रांग मागनं वाढतच चाललीय.
                                        - सचिन जवळकोटे

Web Title: Please tell .. What is the 'sign'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.