श्रीनगर विमानतळ उडवण्याचा कट उधळला; स्टीलच्या डब्यात आयईडी, सुरक्षा दलाची सतर्कता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:55 AM2021-09-22T09:55:59+5:302021-09-22T09:57:06+5:30
मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला.
सुरेश एस. डुग्गर
जम्मू : श्रीनगरविमानतळाजवळ मोठा बाँबस्फोट घडवण्याचा कट सुरक्षादलांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. अतिरेक्यांनी विमानतळाजवळ गोगो गल्लीत स्टीलच्या डब्यात आयईडी ठेवले होते. सुरक्षादलांनी या आयईडीचा शोध लावून बाँबही निष्क्रिय केले.
मध्य कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमानतळ रस्त्यावरील हुम्हामा भागात सुरक्षादलांना मंगळवारी सकाळी त्या भागात गस्त घालत असताना एक इंप्रोवाइज्ड एक्स्प्लोसिव्हज डिवाइस (आयईडी) दिसला. गोगो गल्लीजवळ अंदाजे ६ किलो वजनाच्या स्टील कंटेनरमध्ये आयईडी ठेवल्याचे समजताच सुरक्षादलांनी त्या भागाला सील केले. या स्फोटकांमुळे मोठी हानी झाली असती, असे पोलीस अधिकारी म्हणाले.
उरीमध्ये अतिरेकी घुसले : ३० तासांपासून ऑपरेशन
- नवी दिल्ली : काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये एलओसीवरुन अतिरेक्यांच्या मोठ्या टोळीने घुसखोरी केल्यानंतर सैन्याने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. ३० तासांपासून हे ऑपरेशन सुरु आहे.
- सैन्याच्या सूत्रांनी सांगितले की, एलओसीवर घुसखोरीचा हा दुसरा प्रयत्न आहे. उरी परिसरातील इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद करण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षा दलाला बोलाविण्यात आले आहे.
- अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्च ऑपरेशन १८ आणि १९ सप्टेंबरच्या रात्री सुरु करण्यात आले. नियंत्रण रेषेवर झालेल्या एका चकमकीत एक सैनिक जखमी झाला आहे.
सीमांवर नवी आव्हाने -राहुल गांधी
चीन सीमेवर पायाभूत सुविधांमध्ये वाढ करीत असल्याच्या प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा आधार घेऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी भारत सीमांवर युद्धाच्या नव्या प्रकारांना तोंड देत आहे, असे ट्विटवर म्हटले.
चीनने लडाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर किमान १० नवे हवाई तळ बांधले असल्याची आणि भारतीय सीमांजवळ पायाभूत सुविधांमध्ये वाढ केल्याची वृत्ते नुकतीच प्रसिद्ध झाली होती. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील संवेदनशील भागात दोन्ही देशांनी सुमारे ५० ते ६० हजार सैन्य तुकड्या सध्या तैनात केलेल्या आहेत.