अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात संपवण्याचा कट; आपच्या नेत्यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 05:23 AM2024-04-21T05:23:21+5:302024-04-21T05:24:54+5:30
इन्शुलिन घेऊ न देण्यावर आक्षेप, इन्सुलिन न घेतल्यास हळूहळू माणसाचे अवयव निकामी होऊ लागतात.
नवी दिल्ली : तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल टाईप २ मधुमेहाचे रुग्ण आहेत. तुरुंग प्रशासन केजरीवाल यांना डॉक्टरांचे उपचार घेऊ देण्याची मागणी मान्य करीत नसून, यातून केजरीवाल यांना संपविण्याचा कट रचला आहे, असा गंभीर आरोप आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
पक्षाच्या नेत्या आणि आप सरकारमधील मंत्री आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेचे १२ ते १७ एप्रिल या दिवसांतील रिडिंगस सर्वांसमोर मांडले. या स्थितीत इन्सुलिन न घेतल्यास हळूहळू माणसाचे अवयव निकामी होऊ लागतात. सरकारचे असे वागणे निर्दयी आहे, असा आरोप आतिशी यांनी केला. न्यायालयीन कोठडी देताना कोर्टाने केजरीवाल यांना रोज शुगर लेवल तपासणे तसेच तुरुंगात ग्लुकोमीटर नेण्याची परवानगी दिली होती, याकडेही आपने सर्वांचे लक्ष वेधले.
केजरीवाल यांच्या आहारावरून आरोप-प्रत्यारोप
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल गेल्या दहा दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांना घरातून मागविलेले अन्न खाण्याची मुभा आहे. केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून उपचारासंदर्भात डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्याची तसेच इन्सुलिन घेण्याची मागणी केली होती. त्यावर ईडीने कोर्टात सांगितले होते की, केजरीवाल जाणूनबुजून गोड पदार्थ खात आहेत. शुगर वाढल्याने कोर्टातून जामीन मिळावा, यासाठी ते असे करीत आहेत. परंतु, यावर कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. यावर पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी आहे.
कोर्टात सुनावणीवेळी केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि रमेश गुप्ता यांनी त्यांच्या आहाराची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत केजरीवाल यांना घरातून ४८ वेळा जेवण देण्यात आले आहे. यातील केवळ तीन वेळा त्यांना आंबे देण्यात आले होते. यावर कोर्टाने ईडीला आपली बाजू मांडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
आहाराची माहिती ईडीला का दिली?
आपच्या नेत्या आणि सरकारमध्ये मंत्री असलेल्या आतिशी यांनी तुरुंग प्रशासनाने केजरीवाल यांच्या जेवणाची माहिती ईडीला ईमेलद्वारे का कळविली, असा सवाल विचारला. इंग्रजांप्रमाणे सरकार तुरुंगातील कैद्यांचे जेवण आणि औषधे रोखण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही आरोप त्यांनी केला होता.