ब्राह्मणांचा पाठिंबा मिळविण्यासाठी डावपेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:40 AM2021-09-08T06:40:52+5:302021-09-08T06:41:22+5:30
उत्तर प्रदेश : मुख्यमंत्रीपदाबाबत काँग्रेसने खुले केले नाहीत पत्ते
व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील कोणताही राजकीय पक्ष ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून पुढे करणार नसला तरी विधानसभेच्या आगामी निवडणुकीत या समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी उत्सुक आहेत. सत्तारूढ भाजप आणि विरोधी समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाकडे आपापले मुख्यमंत्रिपदाचे चेहरे आहेत. काँग्रेसने या मुद्द्यांवर अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत. अल्पसंख्याक समुदायाप्रमाणे या समाजाने निर्णायकपणे मते दिली तर हा समाज निवडणूक निकालावर प्रभाव टाकू शकतो.
बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष पाठिंब्यासाठी या समाजाची मनधरणी करीत आहे, तर भाजपने या समाजाचा पाठिंबा गृहीत धरला आहे. दुसरीकडे, काँग्रेस प्रियांका कार्ड किंवा ब्राह्मण समाजाचे कार्ड खेळावे की नाही, या द्विधेत आहे; परंतु, निवडणुकीनंतरची स्थिती पक्षाच्या दृष्टीने प्रसंगोचित ठरावी म्हणून विभाजित जनादेश काँग्रेसला हवा आहे.
काय आहे राज्यातील इतिहास?
n उत्तर प्रदेशात १५ टक्के ब्राह्मण समाज आहे. पूर्वी, राज्यांत काँग्रेसच्या विजयाच्या समीकरणात ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित समाजाची भागीदारी असायची. परंतु, १९९० मध्ये मंडल आयोग आणि अयोध्या आंदोलनामुळे हे सामाजिक समीकरण दुभंगले.
n विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रियांका गांधी किंवा ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला पुढे करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, शेवटच्या मिनिटाला समाजवादी पक्ष - बसपशी हातमिळवणी केली. त्यावेळी काँग्रेसला विधानसभेत दहापेक्षाही कमी जागा मिळाल्या होत्या.