कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना देणार पेन्शन; पंतप्रधान मोदींची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 07:11 AM2021-05-30T07:11:06+5:302021-05-30T07:11:48+5:30

कोरोना साथीचा फटका बसलेल्या कुटुंबीयांच्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला, तसेच अशा मुलांच्या कल्याणासाठी काही उपाययोजनाही जाहीर केल्या.

PM announces aid free education for Covid orphans pension for employees next of kin | कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना देणार पेन्शन; पंतप्रधान मोदींची योजना

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना देणार पेन्शन; पंतप्रधान मोदींची योजना

Next

नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे कुटुंबातील कर्ता माणूस मरण पावला असेल, तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांना केंद्र सरकारकडून पेन्शन दिले जाईल, तसेच आरोग्य विम्यापोटी मिळणाऱ्या भरपाईत वाढ करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच कोरोना साथीमध्ये आई-वडील गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचा  निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. त्यासाठी या मुलांना मदत करण्याकरिता पीएम केअर्स ही नवी योजनाही सुरू करण्यात आली आहे. 

कोरोना साथीचा फटका बसलेल्या कुटुंबीयांच्या स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला, तसेच अशा मुलांच्या कल्याणासाठी काही उपाययोजनाही जाहीर केल्या. या बैठकीत मोदी म्हणाले की, या मुलांनी उज्ज्वल भविष्य घडवावे, चांगले नागरिक बनावे म्हणून केंद्र सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल. कोरोना साथीसारख्या संकटात देशातील मुलांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.
पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात सांगितले की, कोरोनाने मरण पावलेल्या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबाला  एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पेन्शन मिळेल. अशा कुटुंबीयांना एम्प्लॉइज डिपॉझिटशी जोडलेल्या विमा योजनांचा लाभ दिला जाईल. त्याद्वारे मिळणारी भरपाई ६ लाखांवरून सात लाखांपर्यंत वाढविण्यात येईल. अशा विम्यातून किमान अडीच लाख रुपये भरपाई दिली जाईल. या  योजनेसाठी संबंधित कुटुंबीय १५ फेब्रुवारी २०२० च्या पूर्वलक्षी प्रभावापासून पुढील तीन वर्षांच्या लाभासाठी अर्ज करू शकतात. 

कोरोना साथीमध्ये ज्या मुलांचे आई-वडील किंवा अन्य पालक किंवा दत्तक मुलांचे पालक मरण पावले असतील त्या सर्वांना पंतप्रधान योजनेतून मदत करण्यात येईल. ही मुले १८ वर्षे वयाची झाल्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून दर महिन्याला पाठ्यवृत्ती (स्टायपेंड) दिली जाईल, तसेच २३ वर्षांचे झाल्यानंतर या मुलांना पंतप्रधान केअर्स योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये दिले जातील. 

उच्चशिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकार या मुलांना मदत करेल, तसेच त्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज सरकार भरणार आहे. आयुषमान भारत योजनेंतर्गत या मुलांचा प्रत्येकी ५ लाख रुपयांचा वैद्यकीय विमा काढण्यात येईल.

कोरोनामुळे आई-वडील गमावलेली मुले अठरा वर्षांची होईपर्यंत त्यांच्या नावावर प्रत्येकी १० लाख रुपये जमा झालेले असावेत, अशा रीतीने केंद्र सरकार फिक्स डिपॉझिट योजना राबविणार आहे. त्या पैशातून त्या मुलाला अठरा वर्षे वयानंतर दरमहा खर्चासाठी किंवा उच्चशिक्षणासाठी मदत केली जाईल.

गणवेश, पाठ्यपुस्तकांचा खर्च सरकार करणार
कोरोना साथीमध्ये आई-वडील गमावलेल्या व १० वर्षे वयाखालील मुलांना त्यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयात प्रवेश दिला जाईल. जर हे मूल खाजगी शाळेत शिकत असेल, तर शिक्षण घेण्याच्या हक्कानुसार मंजूर केलेली फीची रक्कम पीएम केअर्स योजनेतून दिली जाईल. त्या मुलाचा गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या यांचा खर्च या योजनेतूनच केला जाईल.
 

Web Title: PM announces aid free education for Covid orphans pension for employees next of kin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.