खट्टर यांच्यावर पंतप्रधान नाराज, सर्व स्तरांतून राजीनाम्याची मागणी, शहांनी राज्यांच्या नेत्यांना घेतले बोलावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:30 AM2017-08-27T00:30:46+5:302017-08-27T00:31:23+5:30

बाबा राम राहीमच्या हिंसक समर्थकांना संरक्षण दिल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर सर्व स्तरांतून होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे.

PM annoyed Khattar, demanded resignation at all levels | खट्टर यांच्यावर पंतप्रधान नाराज, सर्व स्तरांतून राजीनाम्याची मागणी, शहांनी राज्यांच्या नेत्यांना घेतले बोलावून

खट्टर यांच्यावर पंतप्रधान नाराज, सर्व स्तरांतून राजीनाम्याची मागणी, शहांनी राज्यांच्या नेत्यांना घेतले बोलावून

Next

नवी दिल्ली/चंदीगड : बाबा राम राहीमच्या हिंसक समर्थकांना संरक्षण दिल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर सर्व स्तरांतून होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. खट्टर यांच्यामुळे आपण स्वत: व भाजपा अडचणीत आल्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही खट्टर यांच्यावर अतिशय नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांमुळे केंद्र सरकार व स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शनिवारी पंजाब व हरियाणा न्यायालयाची बोलणी खावी लागली. कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, असे केंद्रातर्फे न्यायालयात सांगण्यात आले, तेव्हा हरियाणा हा देशाचा भाग नाही का? असा सवालच न्यायालयाने केला. एवढेच नव्हे, तर मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत, भाजपाचे नाहीत, अशे ताशेरेही न्यायालयाने मारले
त्यामुळे खट्टर यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षातूनच होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून हरियाणातील पक्षाच्या नेत्यांशी शनिवारी चर्चा केली.
बाबा राम रहीमला न्यायालयात नेताना जे जादा संरक्षण देण्यात आले, दोषी ठरविण्यात आल्यानंतर, ज्या प्रकारे हेलिकॉप्टरने नेण्यात आले, रोहतकच्या तुरुंगात जी विशेष वागणूक देण्यात आली, त्याच्या सुरक्षा रक्षकांनी वरिष्ठ अधिकाºयाला मारहाण, धक्काबुक्की केली, त्याच्या बातम्या पसरल्यामुळे हरियाणातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पंचकुलातील रहिवासीही मुख्यमंत्र्यांवर चिडले आहेत. आमच्या सुरक्षेसाठी सरकारने काहीच केले नाही आणि संपूर्ण शहर पेटू दिले, आम्हाला जणू ओलीस धरण्यात आले, अशी टीका अनेक रहिवाशांनी केली आहे.

लष्कराच्या २४ तुकड्या तैनात
कालच्या घटनेनंतर ६00 हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राम रहीमच्या सुरक्षा रक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याला आतापर्यंत झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती.
तीही काढून घेण्यात आली आहे. हरियाणामध्ये लष्कराच्या एकूण २४ तुकड्या पंचकुला (१२), सिरसा (८) मानसा (२) व मानकोट (२) येथे तैनात आहेत.
मात्र, त्या अद्याप कोणत्याही आश्रमात गेलेल्या नाहीत, त्यांना तशा सूचना नाहीत, असे लष्करी अधिकाºयांनी, तसेच हरियाणा सरकारने स्पष्ट केले.

आश्रम सील
न्यायालयाने गंभीर दखल घेत, राम रहीमच्या स्थावर व जंगम अशा सर्व मालमत्तांची माहिती सरकारकडून मागविली. या मालमत्तांबाबत कोणतेही व्यवहार होता कामा नयेत, असे आदेशही दिले. हरियाणातील राम रहीमचे ३६ आश्रम सील करण्यात आले. तेथे लाठ्या, काठ्या व काही शस्त्रे सापडली. सिरसाच्या आश्रमातून बाबाचे अनुयायी बाहेर यायला तयार नव्हते. त्यांना बाहेर काढण्यात आले. राम रहीमचे पंजाबसह इतर ठिकाणी आश्रम असून, तिथेही कारवाई सुरू केली आहे.

हिंसाचाराची कल्पना होती
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज हरियाणातील पोलीस व प्रशासकीय अधिकाºयांची बैठक घेऊ न, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही उपस्थित होते. आम्ही हिंसाचाराची पूर्वकल्पना दिली होती, अशी माहिती इंटेलिजन्स ब्युरोने या बैठकीत राजनाथ सिंह यांना दिल्याचे समजते.
या हिंसाचाराचा फटका पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांना प्रमाणात बसला. अनेक पत्रकार व माध्यमांचे कर्मचारी यांना मारहाण झाली.

काँग्रेसचे नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परिस्थिती हाताळण्यात सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे अपयश आले आणि त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ, हिंसाचार झाला, असे सांगून ते म्हणाले की, या साºयाला केवळ आणि केवळ मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना पदावर राहण्याचा अजिबात हक्क नाही. त्यांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यास, केंद्र सरकारने त्यांचे सरकार बरखास्त करावे आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही हुड्डा यांनी केली.
उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाच्या नेत्या मायावती यांनीही मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही खट्टर यांना हटविण्याची मागणी केली आहे.

Web Title: PM annoyed Khattar, demanded resignation at all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.