PM Cares फंड मालामाल, कंपन्या झाल्या मेहेरबान! २९०० कोटींचे महादान; पाहा, दानशूरांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:12 PM2023-04-25T12:12:54+5:302023-04-25T12:14:05+5:30
PM Cares Fund: पीएम केअर फंडात एकूण २४७ कंपन्यांनी दान दिल्याची माहिती समोर आली आहे.
PM Cares Fund: पंतप्रधान केअर फंडावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याचे अवघ्या देशाने पाहिले. पीएम केअर फंडासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, यातच आता या फंडासाठी मदतीचा ओघ सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोना संकटाच्या भीषण काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन पीएम केअर फंड सुरू केला होता. यात अनेक दिग्गज दानशूरांसह देशातील सर्वसामान्यांनी दान दिले होते. यातच आता या फंडात २९०० कोटींचे महादान पडल्याची माहिती मिळाली आहे.
कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना तातडीने सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मिळण्यासाठी पीएम केअर फंडाची सुरुवात करण्यात आली होती. मार्च २०२० मध्ये पीएम केअर फंड स्थापण्यात आला. २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीत या फंडात सरकारी आणि खासगी कंपन्यांनी भरभरुन योगदान दिले.
५७ कंपन्यांचा पीएम केअर फंडात मोठा वाटा
पीएम केअर फंडात जमा झालेल्या दानापैकी सरकारी कंपन्यांनी यात २९०० कोटींचे दान दिल्याची माहिती देण्यात आली आहे. या फंडात सरकारीच नाही तर खासगी कंपन्यांनी पण सढळ हाताने देणग्या दिल्या. यामध्ये सरकारी कंपन्यांचा मोठा वाटा आहे. ५७ कंपन्यांनी या फंडात एकूण २,९१३.६ कोटी रुपयांचे दान दिले. पीएम केअर्स फंडात एकूण आलेल्या देणग्यांमध्ये या कंपनीचा वाटा ५९.३ टक्के आहे. प्राइमइन्फोबेस डॉट कॉमने याविषयीची एक सविस्तर माहिती दिली आहे.
कोणत्या कंपन्यांनी दिले महादान?
पीएम केअर्स फंडात एकूण २४७ कंपन्यांनी दान दिले. गेल्या 2 वर्षांत या फंडात ४,९१०.५ कोटी रुपयांचे दान पडले. ONGC या सरकारी कंपनीने या फंडात सर्वाधिक दान दिले. कंपनीने एकूण ३७० कोटी रुपयांची देणगी दिली. याशिवाय मोठ्या देणग्या देणाऱ्या शीर्ष ५ कंपन्यांमध्ये ३३० कोटी रुपये देणारी NPTC ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन तिसऱ्या क्रमांकावर असून, या कंपनीने २७५ कोटी दिले आहेत. इंडियन ऑइलने २६५ कोटी रुपये दान केले, ही कंपनी चौथ्या क्रमांकावर आहे. तर २२२.४ कोटी रुपयांसह पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी दानशूरांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे.
दरम्यान, पीएम केअर्स फंडात २०१९-२० मध्ये ३,०७६.६ कोटी रुपये दान पडले. २०२०-२१ मध्ये हा आकडा १०,९९०.२ कोटी रुपये होता. तर २०२१-२२ मध्ये ९,१३१.९ कोटी रुपयांचे दान या फंडात जमा झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"