VIDEO: सभा सुरू असताना पंतप्रधान मोदींसमोर भाजपच्या कार्यकर्त्याला भोवळ आली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 06:05 AM2021-04-04T06:05:44+5:302021-04-04T06:56:36+5:30
बक्सा जिल्ह्यात तमुलपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आसाममधील लोक हिंसाचाराच्या विरोधात आहेत. विकास, शांतता आणि एकता यांच्यासोबत ते आहेत.
तमुलपूर : उत्तर- पूर्वमधील भूमिगत संघटनांशी झालेल्या शांतता कराराचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाममधील अतिरेक्यांना मुख्य प्रवाहात परतण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर आसाम बनविण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. बक्सा जिल्ह्यात तमुलपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आसाममधील लोक हिंसाचाराच्या विरोधात आहेत. विकास, शांतता आणि एकता यांच्यासोबत ते आहेत.
काँग्रेसवर हिंसाचाराला उकसविण्याचा आरोप करताना मोदी म्हणाले की, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मुख्य प्रवाहात परतलेल्या लोकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी आमची आहे. ज्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केले नाही, त्यांना मी आवाहन करतो की, राज्याच्या भविष्यासाठी व आपल्या स्वत:च्या भविष्यासाठी परत या.
#WATCH: During a rally in Assam's Tamalpur, PM Narendra Modi asked his medical team to help a party worker who faced issues due to dehydration.#AssamAssemblyPollspic.twitter.com/3Q70GPrtWs
— ANI (@ANI) April 3, 2021
कार्यकर्त्याला भोवळ, मेडिकल टीमला तपासणी करण्याचे निर्देश
आसाममध्ये बक्सा येथे एका सभेत पंतप्रधान मोदी भाषण करत असताना गर्दीतील एका भाजप कार्यकर्त्याला भोवळ आली. यावेळी मोदी यांनी आपल्या मेडिकल टीमला निर्देश दिले की, त्या कार्यकर्त्याची तपासणी करावी. मोदी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका कार्यकर्त्याला पाण्याच्या कमतरतेअभावी भोवळ आली. सभेला संबोधित करणाऱ्या मोदी यांचे लक्ष त्या कार्यकर्त्याकडे गेले. व्यासपीठावरूनच त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या टीमला मदत करण्यासाठी पाठवले.
ते म्हणाले की, पीएमओच्या मेडिकल टीमने त्याठिकाणी जाऊन त्या व्यक्तीला मदत करावी.