'देशाचे जवान शहीद होताना मोदी व्यायामात मग्न'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 07:00 PM2018-06-15T19:00:33+5:302018-06-15T19:01:06+5:30
पंतप्रधान फिट, देश अनफिट असल्याची समाजवादी पक्षाची टीका
नवी दिल्ली: लष्कराचे जवान औरंगजेब आणि ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी निर्घृण हत्या केल्यामुळे काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणखी वाढली आहे. काश्मीरमध्ये जवान, संपादकांची हत्या होत असताना पंतप्रधान मोदी मात्र व्यायामात मग्न आहेत, अशी टीका समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केली.
'देशाचे जवान शहीद होत आहेत. पत्रकार, मजूर, विद्यार्थी मारले जात आहेत. मात्र मोदींसाठी तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची आहे. एकीकडे जवान शहीद होताना दुसरीकडे पंतप्रधान व्यायाम करत आहेत. पंतप्रधान फिट, देश अनफिट,' अशा शब्दांमध्ये आझम खान मोदींवर बरसले. काल लष्कराचे जवान औरंगजेब यांची हत्या करण्यात आली होती. रात्री त्यांचा मृतदेह लष्कराच्या हाती लागला. तर रात्री आठच्या सुमारास रायझिंग काश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांची दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या केली.
#WATCH: SP Leader Azam Khan says 'Sena ke jawan ki hatya, patrakar ki hatya, imandaar ki, majdoor ki, chhatra ki hatya sab peeche reh gaye. Pehle fitness kariye...Udhar jawan maare ja rahe theyy aur desh ke Pradhanmantri dand-baithak laga rahe theyy...Pradhanmantri fit desh unfit pic.twitter.com/sof4e1NLje
— ANI UP (@ANINewsUP) June 15, 2018
काल रात्री शुजात बुखारी यांच्यावर लाल चौकात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. बुखारी गाडीत बसत असताना त्यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात बुखारी गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बुखारी यांच्या हत्येचा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला.