पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर; जुनागडमध्ये विविध योजनांची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 03:55 PM2018-08-23T15:55:49+5:302018-08-23T15:56:42+5:30
वलसाड येथे 1.15 लाख कुटुंबांना घरांचे वाटप करण्यात आले .
जुनागड- पंतप्रधान नरेंद्र मोदीगुजरातच्या एकदिवसाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी वलसाड येथे जाऊन त्यांनी 1727 कोटी रुपये देऊन बांधलेल्या 1.15 लाख घरांचे वाटप केले. प्रधानमंत्री आवास य़ोजनेच्या अंतर्गत ही घरे बांधली आहेत. याबरोबरच त्यांनी जुनागड येथे जाऊन विविध योजनांचा आरंभ केला. जुनागडमध्ये 275 कोटी रुपयांचा निधी वापरून बांधलेल्या 300 खाटांच्या रुग्णालयाचे उद्घाटनही मोदी यांनी केले. जुनागड कृषी विद्यापिठातील नव्या मत्स्यपालन महाविद्यालयात मुलींच्या वसतीगृहाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
जुनागडमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, आपले सरकार अनेक नव्या योजनांचा शुभारंभ करत आहे, हा विकास म्हणजे भारत बदलाचे लक्षण आहे. केंद्र सरकारने देशभरात स्वस्त दरात औषधे पुरविण्यासाठी केंद्र उघडले आहे. वलसाडमध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले, ''रक्षाबंधनच्या आदी एक लाखांहून अधिक बहिणींना त्यांचे स्वतःचे घर मिळाले आहे. याशिवाय दुसरी कोणतीही भेट मोठी असू शकत नाही. तुम्हाला घर देऊन एक भाऊ म्हणून मला अत्यंत आनंद होत आहे.
गुजरातमध्ये यापुर्वीही अनेक सरकारे येऊन गेली, आदिवासी समुदायाचे मुख्यमंत्रीही झाले. पण त्यांच्या गावात जेव्हा मी गेलो तेव्हा तेथे पाण्याची टाकी होती पण त्यात पाणी नव्हते. आमच्या सरकारने तेथे पाणी पोहोचवले. आता दिल्लीमधून एक रुपया बाहेर पडला की संपूर्ण 100 पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. प्रत्येक काम कोणतीही लाच न देता झाले आहे.''
पंतप्रधान यापुढे म्हणाले, येत्या 1 ते 2 वर्षांमध्ये भारतातील प्रत्येक घरामध्ये वीज येईल. गुजरातने मला बरेच काही शिकवले आहे. गुजरातनेच मला मोठं केलं आहे. 20122 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील तेव्हा भारतातील प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर मिळालेले असेल. पूर्वी नेत्यांची घरे तयार होण्याच्या बातम्या येत आता गरिबांची घरे तयार होण्याच्या बातम्या येत आहेत.