PM Narendra Modi : ६४ हजार कोटींच्या आयुषमान भारत योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ, उत्तर प्रदेशात नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचेही उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:40 AM2021-10-26T05:40:53+5:302021-10-26T05:44:02+5:30
PM Narendra Modi : उत्तर प्रदेशातील वाराणसी या मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील ५,२०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे, तसेच त्या राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही त्यांनी केले.
नवी दिल्ली : आयुषमान भारत आरोग्य सुविधा योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी प्रारंभ झाला. या योजनेसाठी केंद्र सरकार ६४ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी या मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील ५,२०० कोटी रुपये खर्चाच्या विकास प्रकल्पांचे, तसेच त्या राज्यात बांधण्यात आलेल्या नव्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही त्यांनी केले.
उत्तर प्रदेशमध्ये आधीच्या सरकारांनी आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी फारशी हालचाल केली नाही, अशी टीकाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
२३२९ कोटी रुपये खर्चून उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर, इटाह, हरदोई, प्रतापगढ, फतेहपूर, देवरिया, गाझीपूर, मिर्झापूर, जौनपूर या जिल्ह्यांमध्ये नऊ नवी वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात आली आहेत.
आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आरोग्य योजना राबविताना खूप घोटाळे करणे, त्यातून खूप पैसे कमावणे हे उद्योग उत्तर प्रदेशमध्ये याआधीच्या सरकारांनी केले होते. मात्र, आमच्या सरकारच्या काळात जनतेच्या पैशाचा उपयोग उत्तम योजनांच्या अंमलबजावणीसाठीच केला जातो. देशातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. त्यामुळे भविष्यात आणखी कोणत्याही साथी आल्या तरी त्यांचा नीट मुकाबला करता येईल.