Pm Kisan योजनेला दोन वर्षे पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटद्वारे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 04:10 PM2021-02-24T16:10:08+5:302021-02-24T16:11:49+5:30
pm kisan samman nidhi completed 2 years today : पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) यांनी या योजनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विट करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली : पीएम किसान योजनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या योजनेद्वारे सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. तसेच, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (pm kisan samman nidhi completed 2 years today pm modi tweet)
पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) यांनी या योजनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ट्विट करून सर्वांचे अभिनंदन केले आहे. तसेच, या योजनेने देशातील कोट्यावधी लोकांच्या जीवनात बदल घडवून आणले आहेत, ज्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळत आहे, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठी आणि उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. या व्यतिरिक्त सरकारकडून किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यावरही भर दिला जात आहे.
On this day, 2 years ago the PM-Kisan scheme was launched with an aim to ensure a life of dignity as well as prosperity for our hardworking farmers, who work day and night to keep our nation fed. The tenacity and passion of our farmers is inspiring. #KisanKaSammanPMKisanpic.twitter.com/ycaod6SP0T
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2021
याशिवाय, नरेंद्र मोदींनी दुसर्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'दोन वर्षांपूर्वी या दिवशी ही योजना सुरू केली गेली. अन्नदातांच्या हितासाठी समर्पित या योजनेतून कोट्यावधी शेतकरी बांधवांच्या जीवनात जे बदल आले. त्यामुळे आम्हाला त्यांच्यासाठी आणखी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाली.'
गेल्या सात वर्षांत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना
गेल्या 7 वर्षात केंद्र सरकारने कृषीमध्ये बदल करण्यासाठी अनेक पुढाकार घेतलेले आहेत. यात शेतकऱ्यांसाठी सिंचनापासून ते अधिक तंत्रज्ञान, अधिक ऋण आणि बाजारापासून योग्य पीक विम्यापर्यंत, मृदा स्वास्थवर लक्ष केंद्रीत करण्यापासून मध्यस्थांना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
काय आहे योजना?
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 7 वा हप्ता जाहीर केला. 2019 मध्ये आजच्या दिवशीच ही योजना सुरू झाली. त्याअंतर्गत सरकारकडून दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. सरकारकडून ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.