CoronaVirus: लहान भावाची 'ती' सूचना मोठ्या भावानं ऐकली; देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 07:33 PM2020-04-02T19:33:26+5:302020-04-02T19:38:11+5:30
Coronavirus व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; पंतप्रधानांना स्वीकारली शिफारस
मुंबई: देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. याशिवाय त्यांच्याकडून परिस्थितीची माहितीदेखील घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यांनी उचललेल्या पावलांचं मोदींनी कौतुक केलं.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. याबद्दलचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना दिला. 'आम्ही पूर्ण लक्ष कोरोनाचा प्रसार थांबवण्यावर केंद्रित केलं आहे. पूर्वी चाचणी कमी होत असल्यानं रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांनाही चाचणीची परवानगी दिल्यानं व त्यांचं २-३ दिवसांचं निदान एकत्रितरीत्या हाती येत असल्यानं रुग्णांची संख्या वाढली आहे,' असं मुख्यमंत्र्यांनी मोदींना सांगितलं.
सर्व धर्माच्या धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी करू नये तसंच सामाजिक अंतर पाळावं असं आवाहन करणं गरजेचं असल्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरेंनी केली. त्यांच्या या सूचनेचा विशेष उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी संवाद साधून तसं आवाहन करण्यास सांगितलं.
The Prime Minister also accepted CM Uddhav Balasaheb Thackeray’s suggestion to reach out to religious figures across all denominations to ensure that there is no crowding and social distancing is observed. pic.twitter.com/XM4vo79IY5
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 2, 2020
पंतप्रधानांनी २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना महत्त्वाची सूचना केली. राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्याटप्यानं याचं नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असं न होऊ देण्याच्या सूचना केल्या.
मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहोचलं असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मोदींना दिली. सध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५०० खाटांची सोय फक्त कोविड-१९ साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत, असंदेखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.