मोदी-शहांची हवा ओसरली; आता फक्त 40% भागात भाजपाची सत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:17 AM2019-11-27T10:17:46+5:302019-11-27T10:21:07+5:30
दोन वर्षात अनेक महत्त्वाची राज्यं भाजपाच्या हातून गेली
मुंबई: नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर भाजपाचा देशभरात वेगानं विस्तार झाला. मोदी पंतप्रधान होताच अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली. २०१७ च्या अखेरपर्यंत देशातील ७१ टक्के भागात भाजपाची सत्ता होती. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांचं संघटन, रणनीती कौशल्य यांच्यामुळे भाजपानं देशभरात घोडदौड केली. मात्र चौखूर उधळलेला भाजपाचा वारू रोखण्यात विरोधकांना यश आल्याचं दिसत आहे.
डिसेंबर २०१७ पासून भाजपाची लाट ओसरायला सुरुवात झाली. डिसेंबर २०१७ मध्ये देशातील ७१ टक्के भागात भाजपाची सत्ता होती. मात्र आता केवळ ४० टक्के भागात भाजपाची सत्ता शिल्लक आहे. त्यामुळे मोदी आणि शहा यांचा करिश्मा कमी झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या असल्या तरीही विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी खालावली. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड यांच्यासारखी महत्त्वाची राज्यं राखण्यात भाजपाला अपयश आलं.
दोन वर्षात अनेक राज्य गमावणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रातही धक्का बसला. राज्यात मोठा सर्वात पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता सोडण्याची नामुष्की आली. देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अजित पवारांच्या शपथविधी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांना एकत्र आणत भाजपाचं सत्ता स्थापनेचं स्वप्न धुळीस मिळवलं.