मोदी, शाह, सोनिया, प्रियंका.. सगळे आले, कोरोना लस घेऊन गेले; एका यादीनं अख्खा विभाग हादरला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 10:46 AM2021-12-07T10:46:21+5:302021-12-07T10:49:30+5:30
एका यादीनं संपूर्ण आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर; यादीमध्ये बड्या व्यक्तींच्या नावांसह फोन नंबर
अरवल: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारच्या अरवलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली, असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर..? तुमचा विश्वास बसेल का..? तुम्ही म्हणाल, पंतप्रधान मोदींनी तर दिल्ली एम्समध्ये लस घेतली.. आम्ही तर फोटोही पाहिलेत.. पण थांबा मंडळी.. पंतप्रधान मोदींनीच काय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा या सगळ्यांनी बिहारमध्ये कोरोनाची लस घेतली आहे. सरकारी कागदपत्रांवरून ही बाब समोर आली आहे.
बिहारच्या अरवल जिल्ह्यात आरोग्य विभागानं भलताच प्रताप केला आहे. अरवलमधल्या करपी एपीएचसीमध्ये लसीकरण झालेल्या व्यक्तींची यादी पुढे आली आहे. ही यादी आरोग्य विभागानं तयार केली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची नावं आहेत. या एका यादीनं बिहारच्या आरोग्य विभागातील घोळ समोर आणला आहे. या यादीत मोदी, शाह, सोनिया यांचे फोन नंबरही देण्यात आले आहेत.
दिग्गजांची नावं असलेली बोगस यादी समोर येताच आरोग्य विभागात खळबळ माजली. राज्य आरोग्य समितीनं आरोग्य विभागाला चांगलंच फैलावर घेतलं. यादी समोर येताच दोन डेटा ऑपरेटर्सना कामावर काढून टाकण्यात आलं. आरोग्य आयोजकांच्या सांगण्यावरूनच आपण अशा प्रकारची माहिती यादीत समाविष्ट केली असा दावा त्या दोघांनी केला.
आम्हाला आरोग्य व्यवस्थापकांकडून कोणताही डेटा दिला जात नाही. आमच्यावर दबाव होता. त्यामुळेच आम्ही त्या नावांचा समावेश यादीत केला, असं एका डेटा ऑपरेटरनं सांगितलं. यामुळे आरोग्य विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एका बाजूला ओमायक्रॉनचं संकट असताना दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या कारनाम्यांमुळे बिहार चर्चेत आला आहे.