वर्ल्ड कप फायनल पाहायला जाणार मोदी-शाह; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही पाठवलं निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:21 AM2023-11-17T10:21:25+5:302023-11-17T10:26:37+5:30
India vs Australia World Cup Final: सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अहमदाबादला पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ICC वर्ल्ड कपची फायनल मॅच होणार आहे. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अहमदाबादला पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज आणि उपपंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांनाही या सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि उपपंतप्रधानही हा शानदार सामना पाहतील अशी अपेक्षा आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिक माहिती मिळालेली नाही, ऑस्ट्रेलिया आठव्यांदा फायनल खेळणार आहे.
सध्या नरेंद्र मोदींचा गुजरात दौरा ठरत आहे. चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. पंतप्रधान 19 नोव्हेंबरला दुपारनंतर अहमदाबादला पोहोचतील. सामना पाहिल्यानंतर पंतप्रधान गांधीनगर राजभवनात रात्री विश्रांती घेतील. येथून दुसऱ्याच दिवशी 20 नोव्हेंबरला सकाळी पंतप्रधान राजस्थानच्या निवडणूक दौऱ्यावर रवाना होतील.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून येत आहे. भारतीय संघाने साखळीतील सर्वच्या सर्व नऊ सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, न्य़ूझीलंडवर 70 धावांनी मात करत 2019 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आणि 2021 च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढल्यानंतर भारतीय संघानं विजयाचं जंगी सेलिब्रेशन केलं.