Coronavirus: अनाथ मुलांसाठी मोदी सरकारचा पुढाकार; पीएम केअर्स फंडातून १० लाखांच्या मदतीची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 07:51 PM2021-05-29T19:51:58+5:302021-05-29T19:53:57+5:30
Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर किंचित कमी होताना पाहायला मिळत आहे. देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना पाहायला मिळत असली, तरी मृत्यूंचे वाढलेले प्रमाण चिंतेत भर टाकणारे ठरत आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनामुळे अनेक जण अनाथ झाले आहेत. कोरोनाने पालकांचे छत्र हिरावून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला असून, अनाथ मुलांसाठी पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. (pm modi announced all children who have lost parents due to corona will be supported under PM CARES Children scheme)
कोरोना संकटामुळे हजारो मुले अनाथ झाली आहेत. काही जणांनी एक पालक गमावला आहे, तर काही जणांनी दोन्ही पालक गमावले आहेत. आता या अनाथ मुलांचे पालनपोषण, शिक्षण यांचा मोठा प्रश्न समाजासमोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना आणली असून, या माध्यमातून अनाथ मुलांसाठी १० लाख रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुले ही देशाचे भविष्य आहेत. यासाठी त्यांच्या मदतीसाठी सर्वकाही करण्यात येईल. समाज म्हणून या मुलांकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काम करणे आपले कर्तव्य आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
The children will get free health insurance of Rs 5 lakh under Ayushman Bharat till 18 years & premium will be paid by PM CARES: Prime Minister's Office (PMO)#COVID19
— ANI (@ANI) May 29, 2021
WHO चा इशारा! ‘इतके’ टक्के लसीकरण आवश्यक; तरच होईल कोरोनाचे संकट दूर
आयुषमान योजनेअंतर्गत मोफत विमा
ज्या मुलांचे दोन्ही पालक किंवा सांभाळकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत, अशा सर्व मुलांना १८ वर्षांचे झाल्यानंतर स्टायपेंड म्हणजे निश्चित रक्कम देण्यात येईल. तसेच ही मुले २३ वर्षांची झाल्यानंतर पीएम केअर्स फंडातून १० लाख रुपये दिले जातील, असे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय या सर्व मुलांना आयुषमान योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांचा विमा मोफत उपलब्ध करून दिला जाणार असून, १८ वर्षांपर्यंत याचे सर्व हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असेही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
आमचे पैसे कुठेयत, पेट्रोल ३० रुपयांना कधी मिळणार?; बाबा रामदेव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार
शिक्षणासाठीही पीएम केअर्समधून मिळणार मदत
तसेच दोन्ही पालकांचे छत्र हरवल्यामुळे जी मुले अनाथ झाली आहेत. त्यांना मोफत शिक्षण दिले जाणार असून, उच्च शिक्षणासाठी पीएम केअर्स फंडातून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षणासाठी लागणाऱ्या कर्जाचे हप्ते पीएम केअर्स फंडातून भरले जातील, असेही पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.