पंतप्रधान मोदींच्या 'बूस्टर डोस' घोषणेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 10:30 PM2021-12-25T22:30:09+5:302021-12-25T22:30:37+5:30
१० जानेवारीपासून हेल्थवर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
देशात कोरोनाचा धोका हळूहळू कमी होत असताना कोरोनाचा नवा वेरियंट ओमिक्रॉन मात्र हातपाय परसतो आहे. अशा परिस्थितीत DGCIकडून लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन आपातकालीन स्थितीत मान्यता देण्यात आली आहे. त्यातच शुक्रवारी नाताळ आणि स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बूस्टर डोसबद्दल महत्त्वाची घोषणा केली. १० जानेवारीपासून देशभरातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस दिला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनाही वैद्यकीय सल्ल्याने बूस्टर डोस घेण्याची परवानगी असेल असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होती. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील सात डिसेंबररोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.