मोदींना समजली अंगणवाडी सेविकांची 'मन की बात', मानधनात केली मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 06:31 PM2018-09-11T18:31:41+5:302018-09-11T18:32:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अंगणवाडी सेवकांशी संवाद साधला. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या कष्टाचे कौतूक करताना त्यांच्या अडचणीही मोदींनी जाणून घेतल्या. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अंगणवाडी सेवकांशी संवाद साधला. यावेळी अंगणवाडी सेविकांच्या कष्टाचे कौतूक करताना त्यांच्या अडचणीही मोदींनी जाणून घेतल्या. तसेच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात मोठी वाढही केली. मोदींच्या घोषणेनुसार 3000 रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना आता 4500 रुपये मिळणार आहेत. तर 2200 रुपये मानधन घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना 3500 रुपये मिळणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातील अंगणवाडी सेविका, आशा आणि एनएनएम व प्रमुख सेविकांशी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. आपल्या कार्याने अंगणवाडीची आणि स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या काही अंगणवाडीसेविकांशी मोदींनी संवाद साधला. त्यावेळी, कौतूक करताना त्यांचे प्रश्नही जाणून घेतले. देशाचा पंतप्रधान सांगू शकतो की, त्याचे लाखो हात आहेत आणि ते हाथ म्हणजे तुम्ही, अशा शब्दात मोदींनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे कौतूक केले.
या कार्यक्रमात झारखंड येथील सरायकेलाच्या उर्माल येथील अंगणवाडी सेविका मनिता देवी यांनी एक प्रसंग सांगितला. एका चिमुकल्यास त्याच्या कुटुंबीयांनी मृत ठरवले होते. पण, मनिता यांना त्या बालकाचे ह्रदय सुरू असल्याचे जाणवले. त्यानंतर, त्यांनी एका पाईपच्या सहाय्याने या चिमुकल्याच्या तोंडातून पाणी बाहेर काढले. त्यामुळे लगेचच ते मूल रडायला लागले. हे पाहून सर्वांना आनंद झाला. त्यानंतर, तात्काळ त्या मुलाला त्याच्या आईचे दुध पाजण्यात आल्याचा प्रसंग मनिता यांनी सांगितला. तर, पंतप्रधान मोदींनीही मन लावून ही प्रसंग ऐकला. त्यानंतर मोदींनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करत असल्याची घोषणा केली.
मोदी म्हणाले, ज्या अंगणवाडी कार्यकर्ता, आशा वर्कर यांचे मानधन 2250 रुपये आहे, त्यांना आता 3500 रुपये देण्यात येईल. तर अंगणवाडी सेविकांना 1500 रुपयांऐवजी 2250 रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या अंगणवाडी सेविकांना सध्या 3000 रुपये मानधन मिळते, त्यांना 4500 रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे मोदींनी आजच्या कार्यक्रमात सांगितले. दरम्यान, 1 ऑक्टोबरपासून हे वाढीव मानधन लागू करण्यात येणार आहे.