Independence Day: जाणून घ्या काय आहे 'जल जीवन मिशन'?; मोदी सरकार खर्च करणार 3.5 लाख कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:01 AM2019-08-15T11:01:45+5:302019-08-15T11:04:23+5:30
स्वच्छ भारतनंतर मोदींची मोठी घोषणा
नवी दिल्ली: स्वातंत्र्या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. या भाषणात मोदींनी पेयजल सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत जल जीवन मिशनची घोषणा केली. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच जल जीवन मिशनदेखील जन चळवळ व्हावी, अशी आशा मोदींनी व्यक्त केली. पुढील पिढ्यांना पिण्याचं पाणी मिळावं यासाठी प्रत्येकानं पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
आज देशातील निम्म्याहून अधिक घरांमध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध नाही. त्यांच्या आयुष्यातील बराच वेळ स्वच्छ पाणी मिळवण्यात जातो. त्यामुळे सरकारनं प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे, असं मोदी म्हणाले. येणाऱ्या दिवसांमध्ये जल जीवन मिशनला पुढे घेऊन जाऊ. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं सोबत काम करतील. यासाठी सरकारकडून साडे तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती मोदींनी दिली.
The movement towards water conservation has to take place at the grassroots level. It cannot become a mere Government programme. People from all walks of life have to be integrated in this movement: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) August 15, 2019
पावसाचं पाणी अडवणं, सूक्ष्म सिंचन, जल संवर्धन, जागरुकता, लहान मुलांना पाण्याचं महत्त्व पटवून देणं अशा विविध बाबींचा जल जीवन मिशनमध्ये समावेश असेल. पेयजल सुरक्षेवर भाष्य करताना मोदींनी जैन मुनी महुडींचा संदर्भ दिला. भविष्यात पाणी किराणा मालाच्या दुकानात विकलं जाईल, असं महुडींनी म्हटलं होतं. त्यांची ती भविष्यवाणी खरी ठरली. आज आपण दुकानातून पाणी खरेदी करतो, असं मोदींनी सांगितलं. जल जीवन मिशन केवळ सरकारी अभियान न राहता, ते जनआंदोलन व्हावं, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली.