PM Modi: 'ते लूटमार करायला कधी थकले नाहीत अन् आम्ही कामं करायला'; मोदींचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 07:31 PM2021-11-19T19:31:01+5:302021-11-19T19:31:47+5:30
उत्तर प्रदेशातील महोबा येथे अर्जुन सहाय्यक प्रकल्पाचं (Arjun Sahayak Project) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
उत्तर प्रदेशातील महोबा येथे अर्जुन सहाय्यक प्रकल्पाचं (Arjun Sahayak Project) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. याआधीच्या सरकारांनी बुंदेलखंडला केवळ लुटण्याचं काम केलं. त्यांनी बुंदेलखंडची लूटमार करुन फक्त स्वत:ची भरभराट करण्याचं काम केलं, असा आरोप मोदींनी यावेळी केला. मोदींचा रोख यावेळी सपा, बसपा आणि काँग्रेसच्या दिशेनं होता. बुंदेलखंडमधील रहिवासी पाण्याच्या एका थेंबासाठी इतकी वर्ष त्रास सहन करत होते आणि त्यावेळीच्या सरकारांना याचं काहीच घेणंदेणं नव्हतं. पण यावेळी बुंदेलखंडवासियांना विकास करणारं सरकार मिळालं आहे, असं मोदी म्हणाले.
बसपा आणि सपा सरकारवर निशाणा साधत मोदींनी भाजपा सरकार आता कामं करायला अजिबात थकत नाही असं म्हणताना याआधीची सरकारं लूटमार करायला थकायची नाहीत असं म्हटलं. मोदींनी यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विकास कामांचं तोंडभरुन स्तुती केली. बुंदेलखंडमधून नागरिकांचं शहराच्या दिशेनं होणारं स्थलांतर थांबवण्याचं आश्वासन मोदींनी यावेळी जनतेला दिलं. सरकार रोजगार क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपा सरकारच्या काळातील विकास कामांचा उल्लेख करताना मोदींनी बुंदेलखंड एक्स्प्रेस-वे आणि यूपी डिफेन्स कॉरिडोअर प्रकल्पाचा उल्लेख केला. या कामांकडे पाहून उत्तर प्रदेशातील विकासाचा अंदाज बांधता येतो, असं मोदी म्हणाले.
For the first time, the people of Bundelkhand are seeing the government working for their development. Previous governments did not get tired of looting UP but we do not get tired of working: PM Modi in Mahoba pic.twitter.com/SXSRTkSHUE
— ANI UP (@ANINewsUP) November 19, 2021
उत्तर प्रदेशातील याआधीच्या सरकारवर घराणेशाहीचा आरोप करत मोदींनी शेतकऱ्यांवर इतकी वर्ष केवळ अन्याय सुरू होता असं म्हटलं. याआधीची सरकारं शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याच्याच मानसिकतेनं काम करत होती. शेतकऱ्यांच्या नावानं घोषणा व्हायच्या पण शेतकऱ्यांपर्यंत एक रुपया देखील पोहोचायचा नाही, असं मोदी म्हणाले. भाजपानं शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम केलं आणि आतापर्यंत १ लाख ६२ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.