'PM मोदींच्या लिफाफ्यात निघाले 21 रुपये', पुजाऱ्याचा दावा ठरला खोटा; भाजपनं दिला थेट पुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 07:01 PM2023-09-28T19:01:09+5:302023-09-28T19:01:09+5:30
यासंदर्भात भाजपने एक व्हिडिओ जारी केला आहे. यात काही औरच दिसत आहे...
पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील भगवान देवनारायण मंदिराच्या दान पेटीत एक पांढऱ्या रंगाचा लिफाळा टाकला आणि त्यात 21 रुपये निघाले, अशी चर्चा सध्या सोशल मिडियात सुरू आहे. मात्र आता यावर नवा खुलासा झाला असून सत्यसमोर आले आहे. यासंदर्भात भाजपने एक व्हिडिओ जारी केला आहे. यात काही औरच दिसत आहे.
भाजपने जारी केलेल्या व्हिडिओमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदीमंदिराच्या दान पेटीत काही टाकताना दिसत आहेत. मात्र तो लिफाफा नसून पैसे आहेत. भाजपचे म्हणणे आहे की पंतप्रधान मोदींनी दान पेटीत कुठल्याही प्रकारची लिफाफा टाकलेला नाही, तर नोटा टाकल्या आहेत.
महत्वाचे म्हणजे, ही घटना 28 जानेवारीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुर्जर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान देवनारायण यांच्या 1111 व्या प्रकटदिना निमित्त राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील मालासेरी डूंगरी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी लोकांनी उपस्थितांना संबोधितही केले होते.
पुजाऱ्यानं केला होता असा दावा -
या मंदिराच्या नियमानुसार दान पेटी वर्षातून केवळ एकदाच उघडली जाते. यामुळे ही दान पेटी 25 सप्टेंबरला उघडण्यात आली होती. दान पेटीत तीन लिफाफे मिळाले होते. यावर, मंदिरातील पुजारी हेमराज पोसवाल यांनी दावा केला होता की, हे तीनही लिफाफे वेगवेगळ्या रंगाचे आहेत. यांतील पंतप्रधान मोदींचा लिफाफा पांढऱ्या रंगाचा आहे. पुजाऱ्याने हा लिफाफा सर्वांसमोर खुला केला. याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड करण्यात आला होता.
यासंदर्भात बोलताना पुजारी हेमराज पोसवाल यांनी सांगितले होते की, व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी पांढऱ्या रंगाचा लिफाफा टाकताना दिसून आले आहेत. यावरूनच, हा लिफाफा पंतप्रधान मोदींनीच टाकल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. या लिफाफ्यात 21 रुपये निघाल्याचा दावा हेमराज यांनी केला आहे. याशिवाय उरलेल्या दोन लिफाफ्यांमध्ये प्रत्येकी 101 रुपये आणि 2100 रुपये मिळाले आहेत.