पंतप्रधान मोदी हे तर ब्लफमास्टर; सोनिया गांधी यांची जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 05:15 AM2019-02-14T05:15:04+5:302019-02-14T05:15:21+5:30

सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत.

PM Modi is Bluffmaster; Strong criticism of Sonia Gandhi | पंतप्रधान मोदी हे तर ब्लफमास्टर; सोनिया गांधी यांची जोरदार टीका

पंतप्रधान मोदी हे तर ब्लफमास्टर; सोनिया गांधी यांची जोरदार टीका

Next

नवी दिल्ली : सतत खोटे बोलत राहणे, निष्कारण बढाया मारणे आणि आपल्या विरोधकांना धमकावणे हेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली पाच वर्षे करीत आले आहेत. पंतप्रधान हे ब्लफमास्टरच आहेत. त्यांच्या सरकारचेही तेच तत्वज्ञान आहे, अशी जोरदार टीका यूपीएच्या अध्यक्ष व काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी बुधवारी केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवरच्या पाच वर्षांच्या कामकाजावर टीकास्त्र सोडले. बऱ्याच काळाने त्यांचे इतके आक्रमक भाषण ऐकायला मिळाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या खासदारांनी व्यक्त केली. मोदी सरकार पूर्णपणे हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. दिलेली आश्वासने पाच वर्षे पूर्ण होत आली, सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असे सांगताना सोनिया गांधी यांनी रोजगाराचे आश्वासन, सामाजिक सलोखा याबरोबरच राफेल विमान खरेदीतील घोटाळ्याचाही उल्लेख केला.
नोटाबंदी हा मोदी सरकारचा मोठा घोटाळा होता. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने तसेच घाईघाईने जीएसटी लागू केल्याने अनेक उद्योग व व्यवसाय गाळात गेले, लाखो लोकांचा रोजगार गेला, याचा उल्लेख करून सोनिया गांधी म्हणाल्या की तरीही मोदी सरकार या दोन्हीला आपले यश मानत आहे.
मात्र मोदी सरकारची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेली आहे. जनता या सरकारवर नाराज आहे. सरकारमुळे देशात ठिकठिकाणी निष्कारण तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जनतेचा विश्वासघात
दिलेली आश्वासने पूर्ण न करणे म्हणजे जनतेचा विश्वासघातच होय आणि तो विश्वासघात मोदी सरकारने केला आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला. या सरकारने संसदेचे महत्त्व कमी केले. महत्त्वाच्या विषयांवरील चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदी हजरच राहिले नाहीत, हे त्याचे उदाहरण आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, अशी अस्वस्थता यापूर्वी पाहायला मिळाली नव्हती.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आपला पक्ष अतिशय आक्रमकपणे भाजपाच्या विचारसरणीशी व मोदी सरकारच्या भ्रष्टाचाराशी लढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले; पण ही लढाई यापुढे कायम सुरू राहील. संसदेचे अधिवेशन संपले असल्याने सर्व खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊ न ही लढाई सुरू ठेवायला हवी, असे ते म्हणाले.

Web Title: PM Modi is Bluffmaster; Strong criticism of Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.