पंतप्रधान मोदी खास माणसाला मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत; गुजरात कनेक्शन पुन्हा येणार कामी?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:59 PM2021-05-25T12:59:33+5:302021-05-25T13:04:33+5:30
सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हजारो जणांचा जीव गेला. उत्तर प्रदेशात भीषण परिस्थिती पाहायला मिळाली. वेळेत उपचार न मिळाल्यानं सत्ताधारी आमदारांचा प्राण गेल्याची घटना घडली. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उत्तर प्रदेशातील भाजप सरकारची प्रतिमा डागाळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेवर परिणाम झाल्यानं भाजपनं वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू केल्या आहेत.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. योगींच्या मंत्रिमंडळात लवकरच बदल अपेक्षित आहेत. प्रशासनातून राजकारणात आलेल्या अरविंद कुमार शर्मांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. योगींच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होऊ शकतो. त्यामध्ये पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ए. के. शर्मांना उपमुख्यमंत्रिपद मिळू शकतं. ते गुजरात केडरचे आयएएस अधिकारी होते. पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीय व्यक्तींमध्ये त्यांची गणना होती.
लसींबद्दलचा 'तो' एक निर्णय देशाला भोवणार? मोदी सरकारच्या 'यू-टर्न'नंतरही भारत 'वेटिंग लिस्ट'मध्येच
ए. के. शर्मा विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांना आमदारकी मिळाल्यापासूनच उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र तेव्हा त्यांची निवड करण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वीच शर्मा यांच्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. त्यानंतर शर्मा दिल्लीला गेले. त्यांनी मोदींची भेट घेतली. लखनऊला परतल्यावर ते योगींना भेटले. त्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांना दिल्लीला बोलावण्यात आलं. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी योगी सरकार आणि भाजप यांच्यात काही बदल केले जाणार आहे. विधानसभा निवडणूक नव्या चेहऱ्यांसह लढवण्याचा भाजपचा मानस आहे.