Chandrayaan 2: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री म्हणतात, पीएम मोदींची भेट इस्रोसाठी अशुभ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 12:27 PM2019-09-13T12:27:54+5:302019-09-13T12:36:56+5:30
पंतप्रधान मोदींनी इस्रो कार्यालयाला दिलेल्या भेटीवर टीका
बंगळुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइस्रोच्या बंगळुरुतील कार्यालयाला दिलेली भेट अपशकुन ठरल्याचं कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी म्हटलं आहे. मोदी अशाप्रकारे बंगळुरुत आले होते, जसं काय तेच चांद्रयानाचं लँडिंग करुन संदेश पाठवणार होते, अशा शब्दांमध्ये कुमारस्वामींनी मोदींवर टीका केली. गेल्या आठवड्यात विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क तुटला. यावेळी पंतप्रधान मोदी इस्रोच्या बंगळुरुमधील कार्यालयात उपस्थित होते.
मोदींच्या इस्रो कार्यालयातील उपस्थितीवर कुमारस्वामींनी निशाणा साधला. 'मोदी बंगळुरुत अशा थाटात आले होते, जणू काही तेच चांद्रयान-२ उडवत आहेत. कदाचित मोदींनी इस्रोच्या कार्यालयाला दिलेली भेट तिथल्या शास्त्रज्ञांसाठी अशुभ ठरली,' असं कुमारस्वामींनी म्हटलं. इस्रोनं चांद्रयान-२ मोहिमेसाठी १० वर्षे मेहनत घेतली. २००८ मध्येच या मोहिमेला मंजुरी मिळाली होती, असंदेखील ते पुढे म्हणाले.
चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरचा इस्रोशी असलेला संपर्क गेल्या आठवड्यात तुटला. त्यावेळी विक्रम चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर होतं. यानंतर इस्रोच्या ऑर्बिटरनं विक्रमचा फोटो टिपला. मात्र अद्याप विक्रमशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती इस्रो प्रमुख के. सिवन यांनी दिली. इस्रोसोबतच नासादेखील विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे.