राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी केलं नितीश कुमारांचं अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 07:41 PM2017-07-26T19:41:51+5:302017-07-26T20:52:48+5:30

भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. नितीश कुमारांच्या या इमानदारीचं सव्वाशे कोटी नागरिकांनी स्वागत करायला हवं

PM Modi Congratulate Nitish Kumar after resignation as CM | राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी केलं नितीश कुमारांचं अभिनंदन

राजीनामा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी केलं नितीश कुमारांचं अभिनंदन

Next

नवी दिल्ली, दि. 26 - नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप केला. नितीश कुमारांच्या राजीनाम्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वागत केलं आहे. राजीनामा दिल्याबद्दल त्यांनी नितीश कुमारांचं अभिनंदन केलं. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत सहभागी झाल्याबद्दल नितीश कुमार यांचं अभिनंदन. नितीश कुमारांच्या या इमानदारीचं सव्वाशे कोटी नागरिकांनी स्वागत करायला हवं असं ट्विट पंतप्रधानांनी केलं. देशाच्या विशेषतः बिहारच्या उज्वल भविष्यासाठी राजकिय मतभेद दूर ठेवून भ्रष्टाचाराविरोधात एकत्र येऊन लढणं ही आज देशाची आणि काळाची गरज आहे असं दुस-या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले. 

यापुर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे राजीनामा देऊन राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी नितीश कुमार यांच्यावरील दबाव सातत्याने वाढत होता.  मात्र, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीश नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात अपयशी ठरत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.  

काय म्हणाले नितीश कुमार राजीनाम्यानंतर- 

मी माझ्याकडून प्रयत्न करून थकलोय. मात्र तेजस्वी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचं राष्ट्रीय जनता दलानं स्पष्टीकरणं दिलं नाही. त्यामुळेच मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामा दिला आहे. दीड वर्षाच्या काळात आम्ही बिहारच्या जनतेसाठी शक्य तितकं काम केलं. दारूबंदी, पायाभूत विकास तसंच अनेक कल्याणकारी योजना आम्ही बिहारमध्ये सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी राबवल्या. मात्र, आता परिस्थितीच अशी आली आहे की, माझ्यासाठी काम करणं किंवा आघाडीचं नेतृत्त्व करणं शक्य नाही. त्यामुळे सरकार चालवण्यात किंवा निव्वळ काम करत राहण्यात कोणताही अर्थ उरलेला नाही, असं नितीश कुमार राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. 

बुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची , खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश राज्यपालांना भेटायला गेले. राज्यपालांना भेटून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी आज लालू प्रसाद यादव यांनी आपल्या आमदारांची बैठक बोलावली होती, त्यानंतर नितीश कुमार यांनी तेजस्वी यांचा राजीनामा मागितलाच नाही तसंच कोणतंही स्पष्टीकरण देण्यासही सांगण्यात आलेलं नाही असं लालू यादव म्हणाले होते. 

सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते. नितीश कुमार हे कोणत्याही स्थितीत आपली व आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नव्हते.



 

Web Title: PM Modi Congratulate Nitish Kumar after resignation as CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.