मुलींचे विवाहाचे वय वाढविल्यामुळे पोटशूळ; पंतप्रधान मोदींची सपावर घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:25 AM2021-12-22T06:25:03+5:302021-12-22T06:25:44+5:30
पंतप्रधानांनी केंद्राच्या विविध योजनांमधील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले.
प्रयागराज : मुलींना शिक्षणाची आणि सक्षम होण्याची आणखी संधी मिळावी, यासाठी त्यांच्या विवाहाचे वय १८ वरून वाढवून २१ वर्षे केले आहे. मुलींना या निर्णयाचा आनंद झाला आहे. मात्र, काही जणांना याचा त्रास होत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. पंतप्रधानांनी केंद्राच्या विविध योजनांमधील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर केले. त्यानिमित्ताने प्रयागराज येथे एका जाहीर सभेत ते बाेलत हाेते.
मुलींच्या लग्नाचे वय वाढविण्यास समाजवादी पार्टीने विराेध केला आहे. त्यावरून माेदींनी समाजवादी पार्टीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, की पाच वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील मुलींना गुंडांचा प्रचंड त्रास हाेता. घराबाहेर पडणेही त्यांना कठीण हाेते. मात्र, मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांनी या गुंडांचा चांगलाच बंदाेबस्त केला असून, त्यांना याेग्य ठिकाणी पाेहाेचवले आहे. मुस्लीम भगिनींवरील अत्याचार राेखण्यासाठी ट्रिपल तलाकविराेधात आम्हीच कायदा केला, याचा उल्लेखही माेदींनी आवर्जून केला.