देशात गोसंवर्धनाविषयी बोलणेही काहींना गुन्हा वाटतो; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 06:12 AM2021-12-24T06:12:21+5:302021-12-24T06:13:14+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी १० दिवसांत दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघात आले.
वाराणसी : आपल्या देशातील काही लोकांना गायीविषयी बोलणे हा गुन्हा वाटतो. त्यांना गायी, म्हशी यांच्याविषयी बाेलणे मान्य नसते. तसे करणे त्यांना कमीपणाचे वाटते; पण आमच्यासाठी गाय आणि गोवंश तशीच दुभती जनावरे आस्था व पूजेचा विषय आहेत, कारण देशातील आठ कोटी कुटुंबे पशुधनावर अवलंबून आहेत, असे उद्गार पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काढले.
वाराणसीतील एका गावात गुजरातच्या दूध उत्पादक संघाने डेअरी सुरू केली असून, तिच्यासह आपल्या मतदारसंघातील २१०० कोटी रुपये किमतीच्या २७ विविध प्रकल्पांची सुरुवात वा उद्घाटने केली. ते म्हणाले की, आम्ही सर्वांचा विकास करू इच्छितो, तर विरोधक मात्र समाजाला जात व धर्माच्या आधारे विद्वेषाचे राजकारण करीत आहेत. ते घराणेशाही, गुन्हेगारी यांना उत्तेजन देतात, तर आम्ही सामान्यांच्या प्रगतीसाठी झटतो. गुजरातच्या संस्थेने सुरू केलेल्या डेअरीमुळे शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना दुधाचा योग्य भाव मिळेल. रोज पाच लाख लिटर दुधाचे उत्पादन होईल.
वाराणसीत दुसरा दौरा
- पंतप्रधाननरेंद्र मोदी १० दिवसांत दुसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघात आले.
- याआधी १३ डिसेंबरला काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या कार्यक्रमासाठी ते इथे आले होते. त्यांचा तो दौरा दोन दिवसांचा होता.
- याखेरीज पूर्वांचल एक्स्प्रेसच्या उद्घाटनाला व दोन दिवसांपूर्वी गोरखपूर येथे ते आले होते.