संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाबाबत साेयीस्कर माैन; पंतप्रधान माेदींची विराेधकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:23 AM2021-09-17T05:23:46+5:302021-09-17T05:24:49+5:30
सेंट्रल विस्टाअंतर्गत नव्या संकुलाचे उद्घाटन
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्पाला विराेध करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र माेदींनी घणाघाती हल्ला चढविला. सेंट्रल विस्टा प्रकल्पामध्ये संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाचाही समावेश हाेता. मात्र, विराेधक त्याबाबत मूग गिळून बसले हाेते. स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम जे करायला हवे हाेते, ते आज आम्ही करत आहाेत, अशी कडाडून टीका माेदींनी विराेधकांवर केली.
सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संरक्षण मंत्रालयाच्या संकुलाचे पंतप्रधान माेदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयांचे कामकाज गेल्या ७५ वर्षांपासून जुन्या परिसरात जीर्ण झाेपडीवजा इमारतींमध्ये सुरू हाेते. ते कधीही काेसळू शकेल, अशी अवस्था आहे. विराेधकांनी कधीही तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चिंता केली नाही. आता संरक्षण विभागातील ७००० हून अधिक कर्मचारी नव्या संकुलात चांगल्या आणि सुरक्षित वातावरणात काम करू शकतील. महत्त्वाचे म्हणजे, तिन्ही संरक्षण दलातील कर्मचारी एकाच ठिकाणी काम करणार आहेत. पंतप्रधानांनी यावेळी सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या वेबसाइटचेही उद्घाटन केले.
पंतप्रधानांनी सांगितले, की विराेधकांनी या संकुलाबाबत माैन बाळगणे. कारण त्यांचे खाेटे आणि अपप्रचार उघड झाला असता. आज जेव्हा आपण ‘इझ ऑफ लिव्हिंग’ आणि ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’वर लक्ष केंद्रित करत आहोत, तेव्हा आधुनिक पायाभूत सुविधांचीही तेवढीच महत्त्वाची भूमिका
आहे, असे पंतप्रधान माेदी यावेळी म्हणाले.
असे आहे संरक्षण मंत्रालयाचे नवे कार्यालय
संरक्षण मंत्रालयाचे नवे कार्यालय दाेन बहुमजली इमारतींमध्ये स्थलांतरित होतील. कस्तुरबा गांधी मार्गावरील इमारतीत ४.५२ लाख वर्ग फूट परिसरात १४ तर आफ्रिका एव्हेन्यू येथे ५.०८ लाख वर्ग फूट परिसरात १३ कार्यालये आहेत.
७००० हून अधिक कर्मचारी करतील काम; ७७५ काेटी बांधकामासाठी खर्च, १२ महिन्यांमध्येच काम झाले पूर्ण