CoronaVirus News: पंतप्रधान मोदींची कोरोनाच्या संकटाविषयी मंत्री अन् अधिकाऱ्यांशी चर्चा; 5 राज्यांनी टेन्शन वाढवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 07:58 PM2020-06-13T19:58:53+5:302020-06-13T20:04:42+5:30
या बैठकीत साथीच्या आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला असून, कोरोनाशी लढा देण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्लीः देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ज्येष्ठ मंत्री आणि अधिका-यांसमवेत एक बैठक घेतली. या बैठकीत साथीच्या आजाराच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला असून, कोरोनाशी लढा देण्यासाठी काही उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधानांनी दिल्लीसह देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, आयसीएमआरचे डीजीही या बैठकीस उपस्थित होते.
विनोद पॉल यांनी केले सादरीकरण
दरम्यान, एनआयटीआय आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी सद्यस्थिती व कोरोना विषाणूच्या संसर्गाची संभाव्य परिस्थिती यावर सादरीकरण(प्रेझेंटेशन) केले. कोरोना संसर्गाची दोन तृतीयांश प्रकरणे पाच राज्यात आहेत आणि त्या राज्यांतील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मोठ्या शहरांमध्ये हे आव्हान पेलण्यासाठी चाचण्या, बेड आणि आरोग्य सुविधांची संख्या वाढविण्यावर या बैठकीत चर्चा झाली.
या दरम्यान, पंतप्रधान मोदींनी शहर व जिल्हा रुग्णालयातील बेड/विलगीकरण कक्षातील बेड्सच्या आवश्यकतेनुसार आलेल्या शिफारशींकडे लक्ष वेधले. तसेच आवश्यकतेनुसार आरोग्य मंत्रालयाच्या अधिका-यांना राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचा सल्लामसलत करून आपत्कालीन योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्याची सुरुवात लक्षात घेता योग्य ती तयारी करावी, असा सल्ला पंतप्रधानांनी मंत्रालयाला दिला आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत आपत्कालीन बैठक बोलावण्याची गरज- पंतप्रधान
या कालावधीत दिल्लीतील कोरोना विषाणूच्या परिस्थितीवरही चर्चा झाली आणि पुढील 2 महिन्यांपर्यंतच्या परिस्थितीच्या अंदाजांवरही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले की, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर, दिल्ली सरकारचे एनसीटी, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकांच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत आपत्कालीन बैठक बोलावून एकत्रित योजना तयार करावी. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे उद्भवलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी त्याविषयी सविस्तर चर्चा व्हायला हवी. या काळात, कोरोनाला हरवण्यासाठी अनेक राज्ये, जिल्हे आणि शहरे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामांचे कौतुकही केले गेले.