PM Modi Maharashtra Government, Corona: "मोदीजी, तुमच्या 'नमस्ते ट्रम्प'मुळे भारतात कोरोनाचा स्फोट झाला, आम्हाला दोष देऊ नका"; महाविकास आघाडीच्या मंत्र्याचा मोदींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:22 AM2022-02-08T11:22:36+5:302022-02-08T11:29:39+5:30
"तुम्ही विचार न करता लोकांना थाळया वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोकं अजूनही भोगत आहेत"
PM Modi Maharashtra Government, Corona: लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर उत्तर दिले. त्यावेळी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केली आणि कोरोना देशभरात काँग्रेसनेच पसरवला, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला. पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत असताना काँग्रेसवाले महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटं वाटत होते, हे खूप मोठं पाप असल्याचंही मोदी म्हणाले. त्यावर, गुजरातमधील नमस्ते ट्रंप कार्यक्रमामुळेच देशात कोरोनाचा स्फोट झाल्याचा पलटवार महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आला.
"कोरोना काळात महाराष्ट्र सरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादला. नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला. त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नाही असं सांगितलं होतं. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आलं. ट्रम्पना प्रोत्साहन देण्यात आलं आणि तेथूनच देशभरात कोरोना पसरला", असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
"मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीटे दिली. कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना त्यांची सर्व व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली, कारण तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तर प्रदेश व बिहारचे मजूर चालत निघाले होते. मग आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या. परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळया वाजवायला लावल्या. त्याचा परिणाम लोकं भोगत आहेत", असेही नवाब मलिक म्हणाले.