नरेंद्र मोदींनी जपानचे पंतप्रधान किशिदा यांना भेट दिली 'कृष्ण पंखी'; जाणून घ्या खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:19 AM2022-03-20T08:19:43+5:302022-03-20T08:28:57+5:30
PM Modi gifts Japanese counterpart Fumio Kishida a 'Krishna Pankhi' : जपान सरकारचे प्रमुख म्हणून किशिदा यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. याबाबत मोदींच्या कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - भारताच्या दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी 'कृष्णा पंखी' भेट दिली आहे. हे चंदनाच्या लाकडापासून तयार केलेले असून त्याच्या बाजुच्या कलात्मक आकृत्यांमधून भगवान कृष्णाच्या विविध मुद्रांचे चित्रण केलं आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पंखी' पारंपारिक साधनांचा वापर करून कोरली गेली आहे आणि वर हाताने कोरलेल्या मोराची आकृती आहे, जो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. ही 'कृष्णपंखी' राजस्थानमधील चुरू येथील कुशल कारागिरांनी तयार केली आहे. कृष्णपंखी ही खास कलाकृती चंदनाच्या लाकडापासून बनलेली आहे जी प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेकडील जंगलात आढळतात. किशिदा उच्चस्तरीय शिष्टमंडळासह भारतात पोहोचले.
(फोटो - झी न्यूज हिंदी)
जपान सरकारचे प्रमुख म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. याबाबत मोदींच्या कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान जपानशी मैत्री मजबूत करत आहेत. दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि किशिदा यांच्यात चर्चा झाली. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठीच्या उपाययोजनांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे असं म्हटलं आहे.