"डझनभर हिंदूंची हत्या, १५२ मंदिरांवर हल्ले"; बांगलादेशातल्या हिंसाचारावर सरकारने काय म्हटलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 20:08 IST2025-02-07T20:03:23+5:302025-02-07T20:08:16+5:30
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.

"डझनभर हिंदूंची हत्या, १५२ मंदिरांवर हल्ले"; बांगलादेशातल्या हिंसाचारावर सरकारने काय म्हटलं?
Bangladesh Violence: बांगलादेशात गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारात हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर कट्टरतावाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांबद्दल जगभरात चिंता व्यक्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी झालेल्या हिंसक आंदोलनानंतरही बांगलादेशातील परिस्थिती सुधारलेली नाही. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या बाबतीत हात वर केले असले तरी गेल्या सहा महिन्यांत बांगलादेश अल्पसंख्याकांसाठी जगणं मुश्किल झालं आहे. हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांबद्दल भारत सरकारने बांगलादेशला इशारा दिला होता. मात्र आता अर्थसंकल्पी अधिवेशनात सरकारने दिलेल्या माहितीमुळे बांगलादेश हिंदूसाठी नरक बनला असल्याचे समोर आलंय.
सत्तांतरानंतरही बांगलादेशात हिंदू मंदिरांची तोडफोड आणि हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. असं असतानाही, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशी सरकार या हल्ल्यांचे दावे फेटाळत आहे. मात्र आता केंद्र सरकारने संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात बांगलादेशातील हिंदूंबाबत आकडेवारी सादर केली आहे. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर गेल्या वर्षी सुरू झालेल्या हिंदूविरोधी हिंसाचारात २३ हिंदूंचा मृत्यू झाला असून १५२ हिंदू मंदिरांवर हल्ले आणि तोडफोड करण्यात आल्याचे सरकारने लोकसभेत सांगितले.
बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी ५ ऑगस्टपासून २३ हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. किमान १५२ हिंदू मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी ही माहिती दिली. "गेल्या दोन महिन्यांत बांगलादेशात हिंदूंवरील हल्ल्याच्या ७६ घटनांची नोंद झाली आहे. गेल्या ऑगस्टपासून २३ हिंदूंचा मृत्यू झाला आहे आणि हिंदू मंदिरांवर हल्ल्यांच्या १५२ घटनांची नोंद झाली आहे," असं मंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी सांगितले.
केंद्र सरकार बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचारावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि बांगलादेशी सरकारला सतत याबाबत विचारणा केली जात असल्याचेही केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
बांगलादेशच्या पोलिसांनी केले कबुल
"परराष्ट्र सचिवांनी ९ डिसेंबर रोजी बांगलादेशला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी बांगलादेश सरकारकडे हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. यानंतर,१० डिसेंबर २०२४ रोजी बांगलादेश सरकारने स्वतः पत्रकार परिषदेत अल्पसंख्याकांवर हल्ल्याच्या ८८ प्रकरणांची माहिती दिली आणि ७० लोकांना अटक केल्याचा दावा केला. तसेच, तपासानंतर बांगलादेश पोलिसांनी १२५४ अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती दिली," असेही कीर्ती वर्धन सिंग यांनी म्हटलं.