"मोदी सरकारच्या अयशस्वी धोरणांमुळे बेरोजगारी आज सर्वोच्च पातळीवर"; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 03:59 PM2022-07-28T15:59:25+5:302022-07-28T16:00:35+5:30
"सत्तेत येण्यासाठी भाजपाने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ केला"
NCP vs BJP PM Modi: सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असलेल्या तरुणांसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी मिळाली. येत्या दीड वर्षात भारत सरकार (Government of India) १० लाख तरुणांना रोजगार देणार असल्याचे सांगत त्यानुसार उपाययोजना करण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी (PM Modi) स्वत: सर्व विभागांना दिले. पुढील दीड वर्षांत मोदी सरकारचे (Modi Sarkar) सर्व विभाग आणि मंत्रालये मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांना नोकऱ्या देणार आहेत. पण राष्ट्रवादीने मात्र यावर टीका केली आहे. 'देशातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र सत्तेत येण्यासाठी भाजपने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ केला' असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
पंतप्रधान मोदी सांगतात की १० लाख तरूणांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातील. सुरूवातीला देखील दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आले होते. पण ती आश्वासने मोदी सरकारने पूर्ण केली नाहीत. देशातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले. मात्र सत्तेत येण्यासाठी भाजपने बेरोजगारांच्या भावनांशी खेळ केला, अशी जोरदार टीका महेश तपासे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सरकारवर केली.
"मोदी सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने लोकसभेमध्ये २०१४ पासून सरकारी नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज प्राप्त झाल्याची कबुली दिली. मात्र, केवळ ७ लाख २२ हजार अर्जांचा विचार करण्यात आला म्हणजे सुमारे ९९ टक्के अर्ज फेटाळण्यात आले आणि एकूण अर्जदारांपैकी केवळ ०.३२ टक्के अर्जदारांनाच नोकरी मिळाली. देशातील तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान मोदी सत्तेवर आले. पण वास्तव समजण्यापासून दूर आहे. अयशस्वी धोरणांमुळे बेरोजगारी आज सर्वोच्च पातळीवर आहे, परंतु मोदी सरकार केवळ द्वेष आणि फूटीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे आणि त्यामुळे समावेशक आणि विकासाच्या मुद्द्यांसाठी त्यांना वेळ नाही" असा टोलाही त्यांनी लगावला.