आत्मविश्वास म्हणजे बाजारात विकत मिळणारे औषध नव्हे- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 02:13 PM2018-02-16T14:13:41+5:302018-02-16T15:54:44+5:30

मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून बोलत आहे.

PM Modi holds Pariksha Pe Charcha an interactive session with students in Delhi | आत्मविश्वास म्हणजे बाजारात विकत मिळणारे औषध नव्हे- नरेंद्र मोदी

आत्मविश्वास म्हणजे बाजारात विकत मिळणारे औषध नव्हे- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली: आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मात्र, तो कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. ते शुक्रवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी देशभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारले. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्यावेळी तणावमुक्त कसे राहाल, याबद्दल मार्गदर्शन केले. 

मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून बोलत आहे. आज तुम्ही माझी परीक्षा घेणार आहात आणि मला गुण देणार आहात. आयुष्यात स्वत:मधला विद्यार्थी कधीच मरून देऊ नका, त्यामुळे माणसाला जगण्याची ताकद मिळते, असे सांगत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. विद्यार्थी एरवी विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीची उपासना करतात. मात्र, परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी हनुमानाची उपासना करावी, असे मोदींनी सांगितले. 

मी शाळेत असताना इतरांना विनोद सांगायचो. परंतु, त्यामुळे माझ्यातील आत्मविश्वास वाढत आहे, ही गोष्ट तेव्हा मला समजली होती. आत्मविश्वास ही जीवनात खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते. मात्र, आत्मविश्वास म्हणजे बाजारात मिळणारे औषध नव्हे जे एखादी आई परीक्षेच्या दिवशी आपल्या मुलाला देईल. स्वामी विवेकानंद नेहमी एक गोष्ट सांगायचे. ३३ कोटी देवीदेवतांची पुजा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या, पण जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर ३३ कोटी देवही तुमची मदत करु शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. आत्मविश्वास नसेल तर तुमची मेहनत वाया जाते, तुम्हाला परीक्षेत उत्तर येत असेल पण आत्मविश्वासाअभावी आठवणार नाही, त्यामुळे जीवनात आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्मविश्वास कमावण्यासाठी इतरांशी नव्हे तर स्वत:शीच स्पर्धा करा आणि मेहनत करा, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

तसेच पालकांनी मुलांवर दबाव टाकू नये, असा सल्लाही मोदींना दिला. आई-वडील दुसऱ्यांशी आमची तुलना करतात, या दबावातून आम्ही चांगली कामगिरी करु शकत नाही. अशा परिस्थितीला कसे सामोरे जायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून मोदींना विचारण्यात आला. यावर मोदी म्हणतात, तुम्ही मित्र-मैत्रिणींशी स्पर्धा का करता. तुमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे हे समजून घ्या. दुसऱ्याचे अनुकरण करताना तुमच्या पदरी निराशाच येते. तुमची बलस्थाने ओळखा आणि त्याच दिशेने पुढे जात राहा, असा सल्ला त्यांनी दिला.
 

Web Title: PM Modi holds Pariksha Pe Charcha an interactive session with students in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.