सबमरीन ऑप्टिकल फायबर केबलचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 03:45 AM2020-08-10T03:45:33+5:302020-08-10T06:49:53+5:30
दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पास पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात झाली होती.
नवी दिल्ली : चेन्नई ते अंदमान-निकोबारदरम्यान २३०० कि.मी. लांबीच्या अत्याधुनिक सबमरीन आॅप्टिकल फायबर केबलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण होणार आहे. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) च्या देखरेखीत हा प्रकल्प पूर्ण झाला. मराठी अधिकारी विलास बुरडे या संस्थेचे संचालक आहेत. सबमरीन केबलमुळे चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, पोर्ट ब्लेअर ते स्वराज द्वीप (हॅवलॉक), लिटल अंदमान, कार निकोबार, कामोरता, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड व रंगत हे आठ द्वीपसमूह जोडले जातील. अंदमान आणि निकोबार बेटांवरही मोबाईल, लँडलाईन दूरसंचार सेवा अत्यंत जलद होईल. दोन वर्षांपूर्वी या प्रकल्पास पंतप्रधानांच्या हस्ते सुरुवात झाली होती.
चेन्नई ते पोर्ट ब्लेअरदरम्यान सबमरीन ओएफसी लिंक २ ७ २०० जीबीपीएस प्रतिसेकंद बँडविड्थ असणार आहे. पोर्ट ब्लेअर व इतर बेटांदरम्यान २ ७ १०० जीबीपीएस असणार आहे. ४ जी मोबाईल सेवेत मोठी सुधारणा त्यामुळे होईल. कनेक्टिव्हिटी वाढल्याने या बेटांवर पर्यटन उद्योग वाढेल. स्थानिर्कांचे जीवनमान उंचावेल. टेलिमेडिसिन , टेली-एज्युकेशन व ई-गव्हर्नन्सची अंमलबजावणी सुलभ होईल. लहान उद्योजकांना ई-कॉमर्समुळे संधी निर्माण होतील. बीएसएनएलने या प्रकल्पाची अंमलबजावणी केली. टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंटस् इंडिया लिमिटेड प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार कंपनी आहे. प्रकल्पासाठी १२२४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
‘यूएसओएफ’ची कामगिरी : मराठी अधिकारी विलास बुरडे संस्थेचे संचालक
माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार विभागाच्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) वर या प्रकल्पाची जबाबदारी होती.
2016 पासून बुरडे याच संस्थेचे संचालक आहेत.
1995 मध्ये भारतीय दूरसंचार सेवेत बुरडे यांची निवड झाली. मुंबई, ठाणे, नाशिक व सुरत येथेही त्यांनी काम केले.
2013 मध्ये दिल्लीत कर्मचारी निवड आयोगाचे (ररउ) प्रादेशिक संचालक म्हणून प्रतिनियुक्तीवर आले. दिल्लीस्थित बुरडे पुढचे पाऊल या मराठी अधिकाऱ्यांच्या संघटनेतही सक्रिय आहेत.