चीन सीमेजवळ भारताचा महासेतू; पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:48 PM2018-12-25T14:48:36+5:302018-12-25T15:08:17+5:30

ब्रह्मपुत्रा नदीवरील 4.94 किलोमीटर लांबीच्या पुलाचं लोकार्पण

PM Modi inaugurates Indias longest rail road bridge in Assam | चीन सीमेजवळ भारताचा महासेतू; पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

चीन सीमेजवळ भारताचा महासेतू; पंतप्रधान मोदींकडून उद्घाटन

googlenewsNext

आसाम: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्वात मोठ्या रेल्वे-रोड पुलाचं उद्घाटन केलं आहे. आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरील 4.94 किलोमीटर लांबीचा पूल आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडतो. या पुलामुळे चीन सीमेपर्यंतचा मार्ग सुकर झाला आहे. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अतिशय मोठं आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)




आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर देशातील सर्वात मोठा रेल्वे-रोड पूल उभारण्यात आला. हा पूल ब्रह्मपुत्रेच्या दक्षिण तटाला धेमाजी जिल्ह्याला जोडतो. हा पूल भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार मानला जातो. कारण हा पूल डबलडेकर आहे. या पुलावरुन वाहनं आणि ट्रेन एकाचवेळी धावू शकतात. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या या पुलाच्या निर्मितीसाठी 4857 कोटी रुपये खर्च आला आहे. पंतप्रधान मोदींनी पुलाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी उत्तरेच्या टोकाच्या दिशेनं प्रवास केला. 




अरुणाचल प्रदेश सीमेवर अनेकदा चीनकडून घुसखोरी केली जाते. त्यामुळे सामरिकदृष्ट्या या पुलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पुलाच्या वरील भागात तीन पदरी रस्ता आहे. या पुलाची उभारणी करताना लष्कराच्या गरजांची विशेष काळजी घेण्यात आली. या पुलावरुन लष्कराचे वजनदार रनगाडे सहजपणे जाऊ शकतात. त्याचवेळी खालील भागात रेल्वेचे दोन ट्रॅक आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या सत्ताकाळात या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पुलाचं काम पूर्ण झालं. त्यामुळे वाजपेयी यांच्या जयंतीला मोदींनी या पुलाचं लोकार्पण केलं. 

Web Title: PM Modi inaugurates Indias longest rail road bridge in Assam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.