पंतप्रधान मोदी 6 मार्चला पश्चिम बंगाल दौऱ्यावर, संदेशखालीतील पीडित महिलांना भेटण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:29 PM2024-02-22T18:29:11+5:302024-02-22T18:30:10+5:30
संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखालीतील पीडित महिलांचे प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. या मुद्द्यावर भाजपसह राज्यातील विरोधी पक्ष ममता सरकारवर सातत्याने लक्ष्य करत आहेत. आता 6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदीपश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. यावेळी ते संदेशखालीतील पीडितांची भेटही घेणार आहेत. संदेशखालीतील महिलांनी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहजहान शेख आणि त्यांच्या समर्थकांवर जमीन हडपण्याचा आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
संदेशखाली प्रकरण समोर आल्यापासूनच भाजप, काँग्रेस आणि डाव्यांचे अनेक नेते घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, प. बंगाल प्रशासनाने सुरुवातीला या नेत्यांना तेथे जाऊ दिले नाही. यानंतर उच्च न्यायालयाची परवानगी घेत, विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांच्यासह काही भाजप आमदारांनी संदेशखाली येथे जाऊन स्थानिकांची भेट घेतली.
यासंदर्भात बोलताना भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे प्रमुख सुकांत मजुमदार म्हणाले, पंतप्रधान मोदी 6 मार्च रोजी राज्यातील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बारासात येथे महिलांच्या एका रॅलिला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथील महिलांछी भेट घेणार का? असा प्रश्न केला असता मजुमदार म्हणाले, "जर संदेशखालीतील माता आणि बहिणींची पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा असेल तर आम्ही निश्चितपणे याची व्यवस्था करू."
संदेशखालीतील सर्वाच्या तक्रारी ऐकल्या जातील - पोलीस महानिदेशक
दुसरीकडे, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, की पोलीस संदेशखालीतील प्रत्येक व्यक्तीची तक्रार ऐकून घेतील आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुमार बुधवारी संदेशखाली येथे गेले होते आणि पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्याच्या अशांत भागातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी रात्रभर तेथेच थांबले होते. येवेळी त्यांनी तेथे महिलांवरील अत्याचारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले.