PM मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते; सलग तिसऱ्या वर्षी बहुमान, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक १६व्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 06:46 AM2023-02-05T06:46:21+5:302023-02-05T06:46:54+5:30
‘द मॉर्निंग कंसल्ट’ने २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल रेटिंग’ हे सर्वेक्षण केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. अमेरिकेची डेटा इंटेलिजन्स संस्था ‘द मॉर्निंग कंसल्ट’ने केलेल्या या सर्वेक्षणात मोदी यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह जगातील २२ देशांच्या नेत्यांना मागे टाकले आहे.
‘द मॉर्निंग कंसल्ट’ने २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत ‘ग्लोबल लीडर ॲप्रूव्हल रेटिंग’ हे सर्वेक्षण केले. यात पहिल्या स्थानी असलेल्या पंतप्रधान मोदी यांचे अप्रुव्हल रेटिंग ७८ टक्के राहिले. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओब्राडोर हे ६८ टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष ॲलेन बेर्सेट हे ६२ टक्के रेटिंगसह तिसऱ्या स्थानी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बेनेस हे ५८ टक्के रेटिंगसह चौथ्या स्थानी, तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला डासिल्व्हा हे ५० टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानी राहिले.
लाेकप्रिय नेते -
नाव लाेकप्रियता (%)
नरेंद्र माेदी (भारत) ७८
जाे बायडेन (अमेरिका) ४०
जस्टिन ट्रृड्यू (कॅनडा) ४०
लिओ वराडकर (आयर्लंड) ३७
ऋषी सुनक (ब्रिटन) ३०
इमॅन्युएल मॅक्राॅन (फ्रान्स) २९
तीन वर्षांपासून मोदीच अग्रस्थानी
जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत पंतप्रधान मोदी हे मागील २ वर्षांपासून सर्वोच्च स्थानी आहेत. मे २०२० मध्ये ते ८४ टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पहिल्या स्थानी होते. सप्टेंबर २०२१ मध्ये मोदी ७० टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पुन्हा पहिल्या स्थानी राहिले. जानेवारी २०२२ मध्ये मोदींना ७१ टक्के लोकांनी पसंती दिली होती. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांचे अप्रुव्हल रेटिंग वाढून ७५ टक्के झाले. यातही ते जगात अव्वल स्थानीच राहिले.
जो बायडेन ७व्या स्थानी -
७ व्या स्थानावरील बायडेन यांचे अप्रुव्हल रेटिंग ४० टक्के आहे. ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक हे १६ व्या स्थानी फेकले गेले आहेत.