आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पीएम मोदी काश्मीरमध्ये दाखल, राज्यात हाय अलर्ट जारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 07:30 PM2024-06-20T19:30:48+5:302024-06-20T19:31:57+5:30
PM Modi Kashmir Visit : जम्मू-काश्मीर दौऱ्यात पीएम मोदी 1500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
PM Modi Kashmir Visit : उद्या, म्हणजेच 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारीच श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. यादरम्यान पीएम मोदी विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Delighted to be in Srinagar. Speaking at the 'Empowering Youth, Transforming J&K' programme. https://t.co/EbNETC95GX
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2024
अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करणार
यासोबतच ते 1500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यावेळी ते 1800 कोटी रुपयांच्या कृषी आणि संलग्न क्षेत्र सुधारणा प्रकल्प लॉन्च करतील. 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमधील 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमासह त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होईल.
राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था
पंतप्रधानांच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी दल सरोवराच्या काठावर 7,000 हून अधिक लोक योगासने करण्यासाठी येतील. पंतप्रधानांचा दौरा शांततेत पार पडावा, यासाठी श्रीनगर शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळाकडे जाणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. श्रीनगर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने येथे ड्रोन चालविण्यास बंदी घातली आहे.